हत्तींसोबत नवा संघर्ष

05 Jun 2025 14:07:04
हत्तींसोबत नवा संघर्ष

तीन वर्षांपूर्वी छत्तीसगडमधून आलेला हत्तींचा कळप महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात स्थायिक झाला आहे. थोडा फार प्रमाणात याठिकाणी मानव-हत्ती संघर्षाची ठिणगी पेटली आहे. ही ठिणगी पेटण्यामागचे मुख्य कारण म्हणजे वन्यजीव भ्रमणमार्गाची न पटलेली ओळख. त्याविषयी माहिती देणारा हा लेख...


आपल्या जंगलातील ‘जेंटल जायेन्टस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या हत्तींचे नाव दिवसागणिक मध्य भारतामधील बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकू लागले आहे. अन्न, पाणी, निवारा या त्यांना सतत लागणार्‍या गोष्टींच्या शोधात फिरणार्‍या या प्राण्याला मोठ्या भूभागाची आणि एकमेकांना जोडणार्‍या जंगलांची गरज असते. मात्र, जंगलाच्या होणार्‍या विखंडणामुळे त्यांची पारंपारिक निवासस्थाने आता छोट्या तुकड्यात विभागली गेली आहेत. म्हणून त्यांना नव्या इलाक्यांच्या शोधात दूर दूर भटकावे लागते!

हत्तींच्या अशा सतत वाढत जाणार्‍या प्रदेशांमधील संवर्धनाची एक अत्यंत महत्वाची अशी संकल्पना म्हणजे वन्यजीव भ्रमणमार्ग! जंगलाच्या दोन अधिवासांना जोडणार्‍या हरित क्षेत्राच्या चिंचोळ्या पट्ट्यांना वन्यजीव भ्रमणमार्ग म्हटले जाते. या चिंचोळ्या पट्यांमधून हत्ती एका अधिवासामधून दुसर्‍या अधिवासात सुरक्षितपणे स्थलांतर करतात. लांबवरचे अंतर मार्गक्रमण करणार्‍या हत्तीसारख्या सस्तन प्राण्यासाठी हे वन्यजीव भ्रमणमार्ग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जर असे भ्रमणमार्ग नसतील, तर हत्ती तुकड्यात विभागल्या गेलेल्या त्यांच्या अधिवासात बंदिस्त होण्याची भीती आहे. अंतर्गत प्रजनन, आवश्यक गरजांची अनुपलब्धता आणि मानवाशी अटळ संघर्ष या तीन गोष्टींमुळे त्यांना अधिवासाची विभागणी तुकड्यांमध्ये करावी लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच तालुक्यात बंदिस्त झालेले हत्ती याचे उत्तम उदाहरण आहे.

फार पूर्वीपासून मध्य भारतातील हत्ती हे प्रामुख्याने ओडिशा आणि झारखंडमध्यल्या दाट जंगलात वास्तव्य करत होते. पण मागच्या काही दशकांत पायाभूत सुविधा, विकास, शेती आणि खाणकाम यांच्या दबावामुळे त्यांचे हे हक्काचे अधिवास खंडित झाले. परिणामी हे हत्ती स्वतःसाठी नवनवे अधिवास, नवे प्रदेश धुंडाळू लागले. प्रथम छत्तीसगडमध्ये आणि आता अलीकडे पूर्व महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये देखील हत्तींचा धुमाकूळ सुरू झाला आहे. या त्यांच्या अधिवास विस्तारामुळे संवर्धकांमध्ये तसेच वन्यजीव विभागामध्ये जोरदार चर्चा घडायला लागली आहे. त्यांच्या स्वतःच्या पदेशामधून हे हत्ती इतक्या दूरवर का येत असावेत, या प्रश्नाचे उत्तर देणे आता अत्यावश्यक झाले आहे. सुरक्षित आणि एकमेकांना जोडणारे अधिवास या दोन गोष्टींमध्ये याच उत्तर दडलेले असू शकते. जसजसे हे हत्ती नव्या अधिवासांच्या आणि परिणामी नव्या प्रदेशाच्या शोधात भटकत आहेत, साहजिकच त्यांना माहिती नसलेले भौगोलिक प्रदेश, मानवी वस्त्या, वाहतुकीचे रस्ते आणि रेल्वे अशा गोष्टींशी सामना करावा लागत आहे. यामुळे नवी आव्हाने तयार होऊ लागली आहेत आणि नव्याने मानव-हत्ती संघर्षाची बीजे पेरली जाऊ लागली आहेत.

या येऊ घातलेल्या संकटाचे निरसन करण्यासाठी हत्तींची अशी आंतर-राज्यीय स्थलांतरे सुलभ करतील असे भ्रमणमार्ग हेरणे आणि संरक्षित करणे महत्वाचे आहे. मध्य भारताचा हा भूभाग पूर्वेकडे पश्चिम बंगाल आणि पश्चिमेकडे पूर्व महाराष्ट्राचा काही भाग इथपर्यंत पसरलेला आहे. या भागामध्ये अशी कितीतरी अत्यंत महत्वाची जंगलक्षेत्रे येतात की, जी नैसर्गिक भ्रमणमार्ग म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. त्यात पालामाऊ, केओन्जार आणि दक्षिण ओडिशा मधली काही जंगले आहेत. अचानकमार आणि इंद्रावती ही छत्तीसगड राज्यातील आणि संजय डूब्री, कान्हा, पेंच, बांधवगड ही मध्यप्रदेशातील आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या समृद्ध जंगलांचा समावेश आहे.

एकीकडे 2023 सालचा हत्तींच्या भ्रमणमार्गाबद्दलचा अहवाल दक्षिण बंगाल, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमधील भ्रमणमार्गांची नोंद घेतो. तर दुसरीकडे सध्याचा हत्तींचा प्रवास बघता इतरही काही न नोंदवलेले मार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात असावेत हे सुद्धा सूचित करतो. या मार्गाचे नकाशे तयार करणे, त्यांचे संनियंत्रण करणे आणि त्यांना संरक्षण देणे या सद्यस्थितीत प्राधान्याने करणे आवश्यक वाटू लागले आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले तर हत्तींच्या संख्येमध्ये संघर्ष, मृत्यू आणि दूरगामी संकटे तयार होण्याची शक्यता आहे. अशा नव्या प्रदेशांमध्ये हत्तींची हालचाल वाढणे या गोष्टींचा संबंध काही फक्त संवर्धनाशी नसून काहीतरी त्वरित कार्यवाही करण्याजोगा हा विषय आहे. अशा भ्रमणमार्गांचे संरक्षण म्हणजे अशा मार्गांवर नुसती कुंपणे घालणे नसून हे मार्ग संरक्षित करणे आहे. की जिथे हत्ती आणि माणूस यांचे एकत्र सहजीवन शक्य होईल. आपल्या देशाचा वेगाने विकास होत असल्यामुळे सध्याची जंगले एकमेकांना जोडलेली असणे ही काळाची गरज आहे. फक्त हत्तींसाठीच नव्हे तर आपल्या एकूण परिसंस्थेच्या सर्वांगीण आरोग्यासाठी जंगलांचे जोडलेपण अत्यंत महत्वाचे आहे. मध्य भारतातील हत्ती हे त्यांच्या गरजा नवनवीन ठिकाणी वावरून अधोरेखित करत आहेत. हे मार्ग धोकाविरहित करून हत्तींना सुरक्षित भ्रमण्याची संधी निर्माण करणे संपूर्ण अधिवासाच्या संरक्षणासाठी मूलभूत ठरेल.

मैत्रयी भावे
(लेखिका भारतीय वन्यजीव संस्थानमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)
Powered By Sangraha 9.0