सोलापुरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

आशाराणी भोसले प्रकरणाने खळबळ

    05-Jun-2025
Total Views |
 
Neelam Gorhe
 
सोलापूर : वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असताना आता सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. दरम्यान, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवार, ४ जून रोजी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
 
सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी, तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दिनांक ३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींच्या मानसिक छळामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेत सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
आशाराणी भोसले या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या आणि त्यांना दोन वर्षांची मुलगीही आहे. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे, सासरच्या मंडळींकडून त्यांना सातत्याने छळ सहन करावा लागत होता. चार ते पाच वेळा घरगुती वाद निर्माण झाल्यानंतर त्यांच्या माहेरच्या मंडळींनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अखेर या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
 
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "या प्रकरणी पोलीस प्रशासनाने सखोल आणि निष्पक्ष तपास करावा. ही आत्महत्या आहे की, पूर्वनियोजित हत्या याचा तपास वैज्ञानिक आणि न्यायवैद्यकीय पद्धतीने करण्यात यावा. घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, आणि गळफास लावण्याच्या स्थितीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करावा. या प्रकरणात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून तत्काळ आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी," असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले. तसेच कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे आणि जलदगतीने तपास करून न्याय दिला जावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
 
यासोबतच पीडित कुटुंबाला आवश्यक ती कायदेशीर आणि मानसिक मदत सरकारमार्फत पुरवण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. आशाराणी यांच्या बाळासाठी कोर्टाची ऑर्डर घ्यावी लागेल का की, तिच्या माहेरची मंडळी स्वतः तिला सांभाळण्यासाठी तयार आहेत, याची माहिती घेऊन त्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवावी, अशा सूचनाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.