सह्याद्रीच्या दर्याखोर्यांमध्ये किंग कोब्रा सापाचे अस्तित्व अलीकडे उलगडलेले असले तरी, इथल्या प्राचीन शिव मंदिरांमध्ये त्याच्याविषयीच्या कथा कित्येक दशके सांगितल्या जात आहेत. महाराष्ट्रातील केवळ दोन तालुक्यांमध्येच आढळणार्या या नागराजाविषयी....
गराज म्हणजेच किंग कोब्रा हा जगातील सर्वांत लांब विषारी साप. हा साप आता महाराष्ट्रातील विविध हवामान परिस्थितींशी जुळवून घेत आहे. २००२ मध्ये, गोवा आणि महाराष्ट्र सीमेवरून पहिल्यांदाच किंग कोब्रा यशस्वीरित्या वाचविण्यात आला. तेव्हापासून, महाराष्ट्र सीमेजवळील गोव्यातील गावांमधून ३८ किंग कोब्रा वाचविण्यात आले. २००२ पासून महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागात गोव्याच्या सीमेजवळ, किंग कोब्रा आढळल्याची आणि त्यांची सुटका करण्यात आली आहे, याचा हा तपशील सर्वात मजबूत पुराव्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्यात किंग कोब्राच्या अस्तित्वाचे भरपूर पुरावे मिळाले आहेत. स्थानिक लोकांच्या प्रत्यक्ष भेटी आणि प्रश्नावलीसाठी प्रादेशिक क्षेत्रीय सर्वेक्षणातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाराष्ट्र सीमेवर गोवा राज्यात दर दहा किमीच्या परिक्षेत्रात किंग कोब्राचे दर्शन वा हत्या किंवा सुटका दिसून येते.
दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वेक्षणातून समोर आलेला वर्तमान अभ्यास नागराजाचा महाराष्ट्रातील अधिवास अधोरेखित करते. सन २०१५ साली ओंकार यादव यांचा तिलारी खोर्यात किंग कोब्रा दिसल्याचा एक छोटा शोध निबंध प्रकाशित झाला होता. त्याआधारे किंग कोब्राच्या अधिवासासंदर्भातील अभ्यासात्मक माहिती गोळा करण्याची सुरवात झाली. सिंधुदुर्गातील दोडामार्ग आणि कोल्हापूरमधील चंदगड या परिसरात माहिती गोळा करण्यासाठी अंदाजे तीन वर्ष एवढा प्रदीर्घ कालावधी लागला. २०१७ ते २०१९ या कालावधीत ९२ ठिकाणी नागराजाच्या अधिवासाचे पुरावे हाती लागले. त्या अभ्यासादरम्यान सर्प इंडिया आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने अनेक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. अतिशय दुर्गम भाग असल्याकारणाने येथे या सापाविषयी माहिती फार कमी होती. अनवधानाने भीतीपोटी आठ हून अधिक नागराज येथे मारले गेले होते. त्यापैकी दोन मारल्या गेलेल्या नागराजांचे फोटो सदर अभ्यासादरम्यान आम्हाला प्राप्त झाले. या हत्या जनजागृतीच्या अभावी झाल्याचे प्रथमदर्शनी जाणवले. त्यानंतर जनजागृती कार्यक्रम सतत घेत राहिल्याने ८ ऑगस्ट २०२१ रोजी,S-RRP इंडिया (NGO) च्या हेल्पलाइन नंबरवर एक कॉल आला. दोडामार्ग तालुयातील वझरे भागातून हा सर्प बचाव कॉल होता. टीमने हा साप नागराज म्हणून ओळखला. हा साप मानवी वस्तीजवळ होता. टीमने ११ फूट लांबीचा आणि ५.५ किलो वजनाचा किंग कोब्रा वाचवला. या सापाचा बचाव रेकॉर्ड महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन विभागाकडे नोंदवण्यात आला. सापाला कोणतीही दुखापत न होता, वन अधिकार्यांच्या देखरेखीखाली त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर आजतागायत चा हून अधिक नागराजांना वाचविण्यात यश आले आहे. पूर्वी गोवा आणि कर्नाटक येथे झालेल्या अभ्यास आधारे महाराष्ट्रात मिळणारा नागराज हे त्याच्या अधिवासाचे विस्तारीकरण अधोरेखित करते.
माहिती संकलनादरम्यान, महाराष्ट्रातील तिलारी येथील नागराज ६६ मीटर ते ४०९ मीटर उंचीवरून दिसल्याचे आढळून आले. २०१७-२०१९ पर्यंत असे दिसून आले की, वर्षाच्या पहिल्या आणि चौथ्या तिमाहीत स्थानिक लोकांना नागराज सर्वाधिक दिसले.
दक्षिण महाराष्ट्र (सह्याद्री पर्वतरांगा) आणि गोवा येथून नागराज ती दिसण्याची किंवा नोंदवण्याची वारंवारता देखील उल्लेखनीय आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या बचावानंतर येथे सादर केलेल्या चार नवीन नोंदींव्यतिरिक्त, आता जवळच्या गावांमधून त्याच्या घटनेची पुष्टी झाली आहे. गेल्या काही वर्षांतील अभ्यासातून असे दिसून आले आहे की किंग कोब्रा त्यांचे क्षेत्र वाढवत आहेत. आम्ही त्या प्रदेशातील पर्यावरणाचे देखील निरीक्षण केले होते आणि असा निष्कर्ष काढला होता की किंग कोब्रा विविध प्रतिकूल हवामान परिस्थितीशी जुळवून घेत आहे. या अभ्यासातून दोडामार्ग, फोंडा घाट पायथ्याशी आणि सावंतवाडी जिल्ह्यातील गावांमध्ये किंग कोब्राचे प्रमुख अस्तित्व दिसून येते. जवळच्या मानवी वस्त्यांमध्ये आढळणार्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात किंग कोब्राच्या वावराच्या नोंदी सध्या पथकाद्वारे निरीक्षण केल्या जात आहेत. सदर अभ्यास क्षेत्रातील जंगलात असलेल्या किंग कोब्राचे दस्तऐवजीकरण केलेले नाही. या प्रदेशातील प्रजातींवरील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अधिक अभ्यास निश्चितच या प्रजातीबद्दल आणि सूक्ष्म अधिवासासाठीच्या त्याच्या पसंतीबद्दल आपल्याला सुधारित माहिती मिळत आहे. ज्यामुळे किंग कोब्राचे संवर्धनाचे प्रयत्न पुढे जाऊ शकतात.
या भागातील सुदृढ नैसर्गिक अधिवासासाठी तात्काळ संरक्षण उपाययोजना करणे काळाची गरज आहे. प्राणी विविधतेचा एक मोठा भाग दस्तऐवजीकरण न करता या अधिवासातून नामशेष होण्यापूर्वी हे करणे गरजेचे वाटते. या प्रजातीच्या अधिक माहितीसाठी आणि विस्तारणार्या श्रेणीबद्दलची कमतरता भरून काढण्यासाठी या सापाच्या टॅगिंगसह सूक्ष्म अधिवासावरील अभ्यास संरक्षण हेतूने खूप महत्वाचा ठरेल.
रोहन वारेकर
(लेखक किंग कोब्राच्या निरीक्षणाचे काम करतात.)