मासेमारी जेव्हा उपासना आणि पूजाभाव धरून केली जाते, तेव्हा मासेमारी बोट हे देवाचे तरंगणारे मंदिर ठरते. यावेळी सागरी जीव हे देवाचे प्रतीक असतात. असा हा महाराष्ट्रातील मच्छीमार आणि सागरी जीवांचे नाते उलगडणारा हा लेख...
Way of life (जीवनशैली), Way of thinking (विचारशैली) and way of worship(उपासनाशैली) या त्रयींतून संस्कृती उभी राहते. यातील प्रत्येक पैलू हा त्या संस्कृती अनुरूप जीवन जगणार्या मानवी समाजाला प्रभावित करत असतो. महाराष्ट्राच्या सागर किनार्यावर राहणार्या व मासेमारी करून आपली उपजीविका करणारा मच्छीमार समाजही याला अपवाद नाही. म्हणूनच पालघरमधील वैती, मांगेला, मांची मच्छीमार समाज, ठाणे-मुंबई-रायगड येथील कोळी, आगरी मच्छीमार समाज,रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील कोळी, गाबीत मच्छीमार समाज यांच्या संस्कृतीमध्ये आपल्याला तुलनात्मक फरक दिसून येतो.
आता मुद्दा आहे की, मासेमारी करताना मच्छीमार बांधवांची सागरी जीवांबद्दल काय भूमिका आहे? ‘समुद्री कासव’ जर कधी आपल्या जाळ्यात अडकले, तर बर्याचवेळा त्याला जाळ्यातून मुक्त करतात. याच्यामागे कधीच संघर्ष नसतो, तर तो असतो सहसंबंध. कारण, यात हे कासव भगवान विष्णुचे रूप समजले जात. बर्याच वेळा असे कासव जेव्हा जखमी अवस्थेत अडकतात, तेव्हा त्याला बोटीवर असलेले हळद किंवा चंदन लावून समुद्रात सोडले जाते. नारळ आणि अगरबत्ती वाहून त्याची सुटका केली जाते. म्हणूनच ही मंडळी कासव समुद्रात दिसले की, त्यापासून आपली बोट दूर करतात किंवा जर ते जाळ्यात अडकले, तर त्याला लगेच समुद्रात सोडून देतात. यामागची धारणा असते की, हे कासव सोबत असणे म्हणजे आपली मुले मृत होणे.
गुजरातमधील वलसाड येथील व्हेलच्या मंदिरात, व्हेल हे देव म्हणून पुजले जातात. त्याचबरोबर महाराष्ट्रातदेखील व्हेल वा सोप्या शब्दांत ‘देवमासा’ला मत्स्य अवतार म्हणून पुजले जाते. मच्छिमारांना जेव्हा कधी असे देवमासे समुद्रात दिसतात, तेव्हा आवर्जून नारळ आणि अगरबत्ती दाखवून आपली समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
जेव्हा मासेमारी केवळ नफा आणि उपभोग या तत्त्वांवर आधारित असते, तेव्हा जाळ्यांमध्ये अडकलेले दृश्य अत्यंत भयावह ठरते. विशेषतः समुद्री सस्तन प्राण्यांसाठी. याउलट मासेमारी जेव्हा उपासना आणि पूजाभाव धरून केली जाते, तेव्हा मासेमारी बोट हे देवाचे तरंगणारे मंदिर ठरते. ‘टेम्पल्टन’ आणि ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्कार विजेते भारतीय तत्त्वज्ञानी पांडुरंग शास्त्री आठवले यांनी मच्छीमार समाजाला याच तत्त्वावर ‘मत्स्यगंधा’ हा प्रयोग दिला आहे, ज्या माध्यमातून मच्छीमार मंडळी मासेमारी करताना मासेमारी, सागरपूजन आणि समुद्र संवर्धन यांचे संतुलन साधतात.
मासेमारी समाजातील समुद्रासोबतच असलेले सकारात्मक नाते समजून घ्यायचे असेल, तर काही सामाजिक पैलू समजून घ्यावे लागतील. यात रायगड जिल्ह्यात काही भागांत गौरी-गणपतीला चिंबोरी/खेकडे यांचे प्रसाद स्वरूप देवाला अर्पण करणे, हे विशेष आहे. त्याचबरोबर खांदेरी बेटावर असलेले वेताळ देवाचे मंदिर. या मंदिरात मच्छीमार मंडळी ही देवाला जाळ्यात कधी चुकून मृतावस्थेत अडकलेल्या ‘सॉ फिश’ची सोंड अर्पण करतात. भारतातील इतर राज्यांशी तुलना करता, महाराष्ट्रातील मच्छीमार, मासेमारी आणि सागरी जीव यातील संबंध हा सहज किंवा सहकारात्मक आहे.
डॉल्फिनबद्दलची धारणा
‘गादा’, ‘गादा रेडा’, ‘मामा’ म्हणून मच्छीमार मंडळी आपल्या सागरी क्षेत्रात राहणार्या ‘इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन’बद्दल विशेष उत्सुक असतात. बर्याच वेळा हे डॉल्फिन मासेमारी करताना मासेमारी करणार्या बोटीच्या अवतीभवती विचरण करत असतात. कधी ते ट्रॉलरमधील मासे खातात, तर कधी ‘शोर साईन’ पद्धतीने मासे पकडण्याच्या जाळी ओढताना बाहेर पडणारे मासे हळूच मटकवतात. पण, सुदैवाने महाराष्ट्रात आजदेखील डॉल्फिनची शिकार मच्छीमार मंडळींनी केली, अशी नोंद नाही. हे मच्छीमार आणि डॉल्फिन यातील सहजसंबंध दर्शवतात. दुर्दैवाने कधी हे डॉल्फिन जाळ्यात अडकले, तर ही मंडळी त्याची सुटका करण्याचा आवर्जून प्रयत्न करतात. आता वैज्ञानिक मंडळीदेखील अशा परिस्थितीत मच्छिमारांचे नुकसान होऊ नये, म्हणून अकाऊस्टिक
पिंजर, रंगीत जाळी किंवा टर्टल एसयुडर डिव्हाईस वापरण्याचे मार्ग अवलंबत आहेत.
प्रदीप चोगले
(लेखक सागरी संशोधक आहेत.)