राम दरबारात विराजले मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम

05 Jun 2025 14:58:39
 
Ayodhya Ram Darbar Pran Pratishtha

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ayodhya Ram Darbar Pran Pratishtha)
गंगा दशहराचे औचित्य साधून वैदिक मंत्रोच्चारात अयोध्येतील श्रीराम मंदिरातील राम दरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवारी संपन्न झाला. या सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती होती. पहिल्या मजल्यावरील राम दरबारात येणाऱ्या भाविकांना प्रभू श्रीराम यांच्यासह माता सीता, हनुमान, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नन यांचे दर्शन घेता येईल. यावेळी संपूर्ण अयोध्या नगरी उजळून निघाली होती. सर्वत्र रामनामाचा जयघोष होत होता. अयोध्येत गेल्या तीन दिवसांपासून प्राणप्रतिष्ठेचा धार्मिक विधी सुरू होता.
 
हे वाचलंत का? : ट्रम्पच्या 'या' निर्णयाने उडवली मुस्लिमबहुल राष्ट्रांची झोप!
 
प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील प्रत्येक रस्ता, मंदिर, रस्ता सजवण्यात आला आहे. राम नगरी सर्वत्र भगव्या झेंड्यांनी, फुलांच्या सजावटीने, रांगोळ्यांनी आणि दिव्यांच्या प्रकाशाने झगमगत आहे. राम मंदिरात लवकरात लवकर राम दरबार सजवण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे जेणेकरून राम लल्लासोबत राजा राम आणि त्यांचा दरबारही पाहता येईल. राम दरबारात, भगवान राम आणि माता सीतेची मूर्ती २ फूट उंच असून पांढऱ्या संगमरवरी सिंहासनारूढ स्वरूपाची आहे.

श्रीराम जन्मभूमी येथे येण्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हनुमानगढीला पोहोचले. याठिकाणी त्यांनी विधीनुसार महावीर हनुमानाची पूजा केली. त्यानंतर श्रीराम मंदिरात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी रामलल्लाची पूजा केली. चांदौलीचे प्रसिद्ध विद्वान पंडित जयप्रकाश तिवारी यांनी १०१ वैदिक आचार्यांसह एकाच वेळी परिसरातील आठही मंदिरांमधील देवांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली.

Powered By Sangraha 9.0