रोजगार संधी वाढवण्याच्या दिशेने राज्याची ठोस पावले

04 Jun 2025 12:35:37
steps towards increasing employment opportunities

मुंबई: एम्प्लॉइर्स फेडरेशन ऑफ इंडिया (EFI) आणि भारतीय उद्योग परिसंघ (CII) यांच्या या उपक्रमातून उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्याचे मूर्त स्वरूप दिसते. महाराष्ट्राने देशात औद्योगिक पुढाकार घेतले असून, कामगार धोरणातील सुधारणा, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, आणि रोजगार संधी वाढवण्याच्या दिशेने राज्याने ठोस पावले उचलली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी आज केले.

मुंबई येथे एम्प्लॉइर्स फेडरेशन ऑफ इंडिया (EFI) आणि भारतीय उद्योग परिसंघ (CII) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित EFI वार्षिक व्यवसाय परिषद व कामगार संबंध उत्कृष्टता पुरस्कार २०२५ या कार्यक्रमात ॲड.फुंडकर यांनी महत्त्वाचे विचार मांडले. या कार्यक्रमाला EFI चे अध्यक्ष अरविंद गोयल, CII पश्चिम विभाग HR-IR पॅनेलचे अध्यक्ष डॉ. सी. जयकुमार, तसेच दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास मंडळाचे अध्यक्ष विरजेश उपाध्याय आदी उपस्थित होते.

कामगार मंत्री ॲड.फुंडकर म्हणाले की, केंद्र शासनाने २९ कामगार कायदे एकत्र करून चार व्यापक कोड तयार केले आहे. हे कायदे अधिक पारदर्शकता, सुसंगतता आणि कामगार हक्कांचे संरक्षण करतील. EFI – CII ने कामगार कायद्यांबाबत, रोजगार-प्रोत्साहन योजना (ELI), तसेच गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांच्या सहभागासाठी धोरण निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रासह देशभरात डिजिटल व्यासपीठांमुळे रोजगार जुळवणी, सल्ला, कौशल्य विकास सुलभ झाला आहे. CII ने पुढील ५ वर्षांत १०० नवीन MCCs उभारण्याचा मानस व्यक्त केला असून हे उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशातील ३०.६८ कोटी असंघटित कामगार नोंदणीकृत असून, त्यात महाराष्ट्रातील १.७३ कोटी कामगारांचा समावेश आहे. या माध्यमातून सामाजिक संरक्षणाचा फायदा असंघटित क्षेत्रात पोहोचवला जात आहे. शिक्षण आणि रोजगार यामधील दरी भरून काढण्यासाठी CII व कामगार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ई2ई लाउंज सुरू करण्यात आले आहेत. येथे करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण व नोकरी संधी दिल्या जात आहेत. महिलांपासून दिव्यांग, युवा, वंचित घटकांचा समावेश आणि समान संधी देणे हे केवळ नैतिक कर्तव्य नाही, तर आर्थिक स्थिरतेचेही मूळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कर्मचारी संबंध म्हणजे केवळ वाद निवारण नव्हे, तर कर्मचारी हे संस्थेची संपत्ती मानून त्यांच्या सक्षमीकरणाचा विचार करणे होय, असेही मंत्री ॲड.फुंडकर यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी, मंत्री ॲड.फुंडकर यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, आपली नेतृत्वगुण आणि मूल्याधारित कामकाजाची पद्धत हा उद्योग क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. आपण सर्वांनी मिळून अशा भारताच्या उभारणीत योगदान द्यायचे आहे, जो रोजगारात समावेशकता, सक्षमता आणि टिकाव धारण करतो.
 
Powered By Sangraha 9.0