नवी दिल्ली: (Pakistani Spy Punjab Youtuber Jasbir Singh Arrested) पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली रूपनगर येथून जसबीर सिंग नावाच्या आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे. मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (SSO) ने जसबीर सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे जसबीर सिंग?
जसबीर सिंग हा रूपनगर जिल्ह्यातील महलान गावातील रहिवासी आहे. त्याचे 'जान महल' नावाचे युट्यूब चॅनल आहे, ज्याचे दहा लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो हरियाणास्थित युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हद्दपार करण्यात आलेला पाकिस्तानी नागरिक एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्या संपर्कात होता. दानिशच्या निमंत्रणावरून जसबीर सिंग याने दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. जिथे त्याच्या पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील लोकांशी ओळख झाली. त्याने २०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये पाकिस्तानला भेट दिली आहे; त्याच्या फोनमधुन अनेक पाकिस्तानी नंबर सापडले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसवीर सिंग हा पाकिस्तान गुप्तचर संस्थेचा गुप्तचर अधिकारी शाकीर यांच्या संपर्कात होता. त्याचे शाकीर उर्फ जट्ट रंधावाशी संबंध उघड झाले आहेत. ज्योती मल्होत्राच्या चौकशीदरम्यान आरोपी जसबीरचे नाव पुढे आले होते. प्राथमिक तपासात पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमधून काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. त्याचवेळी, त्याच्या फोनमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील काही लोकांचे नंबरही सापडले आहेत.
आरोपीला आज मोहाली जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्याचा रिमांड घेतला जाईल. रिमांडदरम्यान पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येईल. या हेरगिरी प्रकरणात आणखी काही लोकांचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. यासंदर्भातील माहिती गुप्तचर विभागाला देण्यात आली आहे. लवकरच केंद्रीय सुरक्षा यंत्रणादेखील आरोपीच्या चौकशीत सहभागी होईल.