पंचायत ४ येतोय! नवीन हंगामासाठी सज्ज व्हा; रिलीज डेट आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची माहिती जाहीर!

04 Jun 2025 16:38:37

panchayat 4 is coming get ready for the new season


मुंबई : 'पंचायत'च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे! 'पंचायत' या लोकप्रिय वेब सिरीजचा चौथा हंगाम आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या आधीचे तीनही हंगाम प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरले होते. फुलेरा गावातील साध्या पण खुमासदार जीवनात प्रेम, मैत्री आणि राजकारणाची चव मिसळत ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तर, जाणून घेऊया की 'पंचायत ४' कधी आणि कुठे पाहायला मिळणार आहे.

'पंचायत ४' कोणी तयार केली आणि कधी प्रदर्शित होणार?
'पंचायत ४' ही मालिका The Viral Fever (TVF) या संस्थेने तयार केली आहे आणि ह्याच कंपनीकडे या मालिकेचे हक्क आहेत. दीपक कुमार मिश्रा आणि अक्षय विजयवर्गीय यांनी याचे दिग्दर्शन केले आहे, तर चंदन कुमार हे लेखक आणि निर्माते आहेत. तुम्ही जर ‘पंचायत ३’ पाहिलं असेल, तर लक्षात असेल की प्रधानजींना गोळी लागली होती आणि फुलेरामध्ये निवडणूकांचं वातावरण चांगलंच तापलं होतं. त्याचवेळी विकासच्या घरीही एक आनंदाची बातमी येणार होती.


'पंचायत ४' मध्ये काय पाहायला मिळेल?
आता मोठा प्रश्न असा आहे की, ‘पंचायत ४’ मध्ये नक्की काय घडणार? अनेक अंदाज लावले जात आहेत की, रिंकी आणि अभिषेकच्या लग्नावर काहीतरी मोठं पाहायला मिळेल. त्यांच्या नात्याला मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्याआधी प्रधानजी आणि मंजू देवी यांची प्रतिक्रिया पाहणं फारच रंजक ठरणार आहे, कारण त्यांना अजून काहीच कल्पना नाही की त्यांच्या घरात काय सुरू आहे! याशिवाय फुलेरामध्ये आणखी बरेच मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.


'पंचायत ४' कधी आणि कुठे पाहायची?
तर, लक्षात ठेवा! 'पंचायत ४' चा ट्रेलर अजून आलेला नसला तरी एक महिना आधी प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. ही मालिका ८ भागांमध्ये प्राईम व्हिडीओ (Prime Video) वर २ जुलै २०२५, बुधवारपासून पाहायला मिळणार आहे. या टीझरमध्ये निवडणूक युद्धाची झलक दाखवण्यात आली होती, ज्यामध्ये भूषण आणि रिंकीची आई एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात उभी असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या निवडणुकीचा परिणाम काय होणार हे पाहणं आता उत्कंठावर्धक ठरणार आहे!


Powered By Sangraha 9.0