शरणागती हाच काँग्रेसचा डीएनए – भाजपाध्यक्ष नड्डांचा पलटवार

04 Jun 2025 19:59:08
शरणागती हाच काँग्रेसचा डीएनए – भाजपाध्यक्ष नड्डांचा पलटवार

नवी दिल्ली, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'नरेंदर - सरेंडर ' या विधानावर भाजप आता आक्रमक झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी इतिहासात शरणागती पत्करली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टिकेस प्रत्युत्तर दिले आहे. एक्सवर पोस्ट करून नड्डा म्हणाले, "राहुल गांधी, तुम्ही शरणागती पत्करली असेल, तुमच्या पक्षाने शरणागती पत्करली असेल, तुमच्या नेत्यांनी शरणागती पत्करली असेल. कारण तुमचा इतिहास असाच आहे. मात्र, भारत कधीही शरणागती पत्करत नाही. शरणागती तुमच्या काँग्रेस पक्षाच्या शब्दकोशात आहे, ती तुमच्या डीएनएमध्ये आहे; असे नड्डा यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाच्या सरकारांचा कार्यकाळ आणि त्यांनी इतिहासात कसे 'शरणागती पत्करली' हे लक्षात ठेवावे. काँग्रेस सरकार दहशतवादाला शरण गेले, शर्म-अल-शेखमध्ये शरण गेले, १९७१ चे युद्ध जिंकल्यानंतर शिमलामध्ये टेबलावर शरण गेले, सिंधू पाणी करारात शरण गेले, हाजी पीर पास शरण गेले, छंब सेक्टरचा १६० किमी क्षेत्र शरण गेले, १९६२ च्या युद्धात शरण गेले, १९४८ मध्ये शरण गेले आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी मुस्लिम लीगलाही शरण गेले होते, अशीही आठवण नड्डा यांनी यावेळी करून दिली.

Powered By Sangraha 9.0