भर पत्रकार परिषदेत राऊतांचा फोन अन् सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी! काय घडलं?

04 Jun 2025 12:24:53
 
Sanjay Raut & Sudjhakar Badgujar
 
नाशिक : उबाठा गटाचे नाशिकमधील उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भर पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी फोन करत या कारवाईचे आदेश दिले. सुधाकर बडगुजर यांनी मंगळवार, ३ जून रोजी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आता बुधवारी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
सुधाकर बडगुजर हे संजय राऊतांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. सोमवार, २ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असताना बडगुजर यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांपुढे आपली नाराजी बोलून दाखवली.
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! अखेर चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली; उबाठा गटाला दणका
"पक्षात संघटनात्मक बदल झाल्यापासून मीच नाही तर संघटनेतील कमीत कमीत १० ते १२ लोक नाराज आहेत आणि मी ते वेळोवेळी वरिष्ठांच्या कानावर टाकले आहे. त्यात सुधारणा करावी अशीही मागणी झाली. परंतू, अजून काही निर्णय झाला नसल्यानं नाराजी आहे. तसेच महानगरप्रमुख विलास शिंदेसुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहे," असा दावा त्यांनी केला होता.
 
त्यानंतर बुधवारी उबाठा गटाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. नाशिक जिल्हा प्रमुख डी. जी. सुर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. मात्र, महानगर प्रमुख विलास शिंदे हे यावेळी उपस्थित होते.
 
दरम्यान, ही पत्रकार परिषद सुरु असतानाच संजय राऊत यांचा माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आदेशाने बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
 
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
 
सुधाकर बडगुजर हे २००७ मध्ये सिडकोतून पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते संजय राऊतांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. नाशिकच्या सिडको परिसरात बडगुजर यांचा चांगला प्रभाव आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0