मुंबई : पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उबाठा गटाचे नाशिकचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची बुधवार, ४ जून रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, आता बडगुजर यांनी हकालपट्टीनंतर यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, "पक्षात नाराजी व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही. मी नाशिक शहराच्या बाहेर असून याबद्दल माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. परंतू, पक्षात नाराजी व्यक्त करणे आणि मुख्यमंत्र्यांना भेटल्यामुळे अशी कारवाई होत असल्यास ती चुकीची आहे. हकालपट्टी करणे हा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. मी त्यावर योग्यवेळी त्यांना उत्तर देईल. माझ्या पुढच्या भूमिकेबाबत वेळ आल्यावर सांगेल."
हे वाचलंत का? - "संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे..."; मंत्री गिरीश महाजनांचा हल्लाबोल
"पक्षात झालेल्या बदलांबाबत मी माझी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असल्यास याबद्दल पक्षप्रमुखांनी ठरवावे. हा एकतर्फी झालेला निर्णय आहे. न्यायालयसुद्धा दोन्ही बाजू ऐकून निर्णय देते. एकतर्फी निर्णय देत नाही. पण ही कारवाई एकतर्फी झाली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर हकालपट्टी करणे ही शिक्षा असेल तर ती मला मान्य आहे," असेही ते म्हणाले.