बीडमध्ये ८४३ ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या! सत्य काय? चित्रा वाघ यांचा मोठा खुलासा

04 Jun 2025 16:52:31
 
Chitra Wagh
 
मुंबई : बीडमध्ये ८४३ ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पुढे आल्या होत्या. दरम्यान, ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी असल्याचे सांगत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
 
आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, "बीडमध्ये ८४३ ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या ही बातमी वाचून प्रत्येकाला धक्का बसला. मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिव्हारी लागले. पण जेव्हा मी सत्य तपासले, तेव्हा लक्षात आले की, ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे."
 
हे वाचलंत का? -  शिवसेनेतील पक्षप्रवेशाबाबत चंद्रहार पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "मला ऑफर..."
 
"मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारून ही माहिती देत आहे. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी २०१९ पासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनाने काही नियम बनवले आहेत. आता उठसूठ कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाही. जर कुठल्या महिलेला गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच बीड जिल्हा शल्य चिकित्सकांची पुर्वपरवानगी घेऊन, तपासणी करून मगच गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते," असे त्यांनी सांगितले.
 
वेगवेगळ्या वर्षांमध्ये झाल्या शस्त्रक्रिया!
 
त्या पुढे म्हणाल्या की, "या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे वेगवेगळ्या वर्षांत झाल्या आहेत. २०१९ पासून तर महिलेला वैद्यकीय गरज असली तर बीड शल्य चिकित्सकाच्या अधिकृत परवानगीशिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत. या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाही. यापैकी २६७ महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही २०१९ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये महिलेला तशी वैद्यकीय गरज असल्यास तपासणीनंतर शल्य चिकित्सकाच्या पूर्वपरवानगीनेच झालेल्या आहेत. उर्वरित ५७६ महिला मजुरांच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया ही २०१९ पुर्वीच झालेल्या आहेत. महिला आणि आरोग्य यांसारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना कृपया पूर्ण शहानिशा करा. गैरसमज आणि भीती पसरवू नका," असे आवाहनही चित्रा वाघ यांनी माध्यमांना केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0