मोठी बातमी! अखेर चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली; उबाठा गटाला दणका
04-Jun-2025
Total Views |
मुंबई : उबाठा गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. येत्या सोमवारी चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी बुधवार, ४ जून रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांची भेटही घेतली. त्यामुळे या चर्चांनी आणखी जोर धरला.
त्यानंतर आता त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. येत्या सोमवारी चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याबद्दल बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "सोमवारी आमच्या पक्षात अनेक लोकांचा प्रवेश होणार आहे. तसेच येणाऱ्या ३० तारखेलासुद्धा अनेक मोठमोठ्या लोकांचा पक्षप्रवेश होणार आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर हा पक्षप्रवेश थांबवा. कुणीही तुमच्याकडे राहण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्या," असा खोचक सल्लाही त्यांनी उबाठा गटाला दिला.