मुंबईतील नदी, नाल्यांतून ८२.३१ टक्के गाळ उपसला

04 Jun 2025 18:42:17
82.31% waste cleaned from river and water drainage system

मुंबई : पहिल्या पावसात मुंबई पाण्यात गेली आणि नालेसफाईचा फुगा पुन्हा फुटला. चौफेर टीका झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर गाळ उपसा सुरू करत, बुधवारअखेर ८२.३१ टक्के गाळ उपसल्याचा दावा केला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्चपासून नालेसफाईला प्रारंभ झाला. यंदा एकूण ९ लाख ६८ हजार मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, ६ मेपासून म्हणजे वेळेपूर्वीच पावसाला सुरुवात झाली आणि मे महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे गाळ उपशाच्या कामावर अंशतः परिणाम झाला. तरीदेखील ७ लाख ९६ हजार ७६५ मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या वर्षी गाळ उपसण्याच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. नालेसफाईपूर्वी आणि नंतरचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, तसेच सीसीटीव्ही निरीक्षणांद्वारे एआयच्या विश्लेषणाच्या आधारे कंत्राटदारांवर ३ कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पावसाळ्यानंतर देखील गाळ उपशाची कामे सुरु राहणार आहेत, असे सांगण्यात आले.

कुठून किती गाळ उपसला?


मोठे नाले : ३ लाख ५७ हजार ४३० मेट्रिक टनचे उद्दिष्ट; प्रत्यक्षात ३ लाख ७८ हजार २१४ मेट्रिक टन गाळ उपसला (१०५.८१%)
लहान नाले: ३ लाख ९६ हजार २६२ मेट्रिक टनचे उद्दिष्ट; प्रत्यक्षात २ लाख ८६ हजार ००४ टन उपसा (७२.१८%)
मिठी नदी: २ लाख १४ हजार ३१५ मेट्रिक टनचे उद्दिष्ट; प्रत्यक्षात १ लाख ३२ हजार ५४५ टन गाळ उपसला (६१.८५%)

‘एआय’चा वापर कसा होतो?


गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने या कामांसाठी छायाचित्रण समवेत ३० सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य केले आहे. गाळ उपसासंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जात आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखता येते, असे मुंबई पालिकेने म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0