पालकांच्या हलगर्जीमुळे दोन वर्षांचा मुलगा मेट्रोबाहेर, मुंबई मेट्रो कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Total Views |

मुंबई, गोरेगावमधील बांगूरनगर मेट्रो स्थानकावर पालकांचे लक्ष नसल्यामुळे दोन वर्षांचा मुलगा मेट्रोमधून अचानक बाहेर आला आणि तिथेच थांबला. मात्र मेट्रो स्थानकावरील तैनात कर्मचाऱ्यानी तात्काळ लक्ष दिल्याने मोठा अनर्थ टळला. या कर्मचाऱ्याने तात्काळ मेट्रो चालकाला ट्रेन सुरू करू नको असे सांगितले. त्यानंतर मेट्रोचे दार उघडले आणि मुलगा पुन्हा सुखरुप आत गेला.

मुंबई मेट्रोच्या बांगुर नगर मेट्रो स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडली. दोन वर्षाचा मुलगा मेट्रोत चढताना आत जाऊन पुन्हा मेट्रोबाहेर आला. लहान मुलगा बाहेर येताच मेट्रोचे दरवाजे बंद झाले तसेच स्थानकावरील दरवाजेही बंद झाल्याने तो मुलगा तसाच स्वयंचलित दरवाजा बाहेर थांबला. मेट्रोचे दरवाजे बंद झाल्याने तो मुलगा कावराबावरा झाला. दरवाजे बंद झाले तरीही तो मुलगा दरवाजापाशी येऊन पालकांना आवाज देत आत जाण्याचा प्रयत्न करू लागला. मेट्रो सुरू होणार इतक्यात फलाटावरील मेट्रो कर्मचाऱ्याने ते पाहिले आणि त्याने ड्रायव्हरला मेट्रो सुरू न करण्याच्या सूचना दिल्या. नंतर तत्परतेने तो कर्मचारी त्या मुलाकडे धावत गेला.

कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचला


एवढं सगळं घडल्यानंतर त्या मेट्रोचे दरवाजे पुन्हा उघडले आणि तो मुलगा आतमध्ये गेला. त्यामुळे त्या मुलाच्या पालकांच्या आणि ते दृश्य पाहणाऱ्या सगळ्यांच्याच जिवात जीव आला. संपूर्ण घटना बांगुर नगर मेट्रो स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. या दोन वर्षांच्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव संकेत चोडणकर असे आहे.




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.