उपनगरीय मागण्या पुन्हा ऐरणीवर

    30-Jun-2025
Total Views |

दिवा मार्गावरील अपघाताने उपनगरी रेल्वेच्या जुन्या मागण्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासदार कै. रामभाऊ म्हाळगी यांच्यापासून ते मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रयत्नांपर्यंत उपनगरी प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक तत्त्वज्ञ आणि संवेदनशील नेत्यांनी आवाज उठवला होता. पण रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.

दिवा-मुंब्रा मार्गावरील अवघड वळणावर सोमवार दि. ९ जून, २०२५ या दिवशी लोकलच्या दोन गाड्यांमधील डब्याबाहेर लोंबकळणारे प्रवासी रेल्वे रुळावर पडून पाच प्रवासी मृत्युमुखी पडले. उपनगरीय प्रवासी संघटनांनी गेल्या ४० वर्षांपासून रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत अनेक सूचना मांडल्या, पण रेल्वे मंत्रालयाने या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले, म्हणून ही दुर्घटना घडली, असे उद्गार फेडरेशन ऑफ सबर्बन पॅसेंजर्स असोसिएशन्सचे तत्कालीन सेक्रेटरी भालचंद्र लोहोकरे यांनी व्यक्त केले.

पहलगामचा घातपात, मुंबईचा अपघात आणि नुकताच झालेला अहमदाबादचा विमान घातपात अथवा अपघात या लगोलग घडलेल्या घटनांमध्ये जो हकनाक जीव गेला, त्यामध्ये त्यांचा स्वतःचा दोष काहीच नव्हता. पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याचा केवळ निषेध नोंदवून सरकार स्वस्थ न बसता ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे चांगला बदला घेतला, त्याबद्दल जनतेला समाधान वाटले. अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीस तत्काळ सुरुवात झाली आहे. पण मुंबईतील अपघाताबाबत जनतेला फार दुःख वाटते आहे. कारण प्रवाशांनी, प्रवासी संघटनांनी व लोकप्रतिनिधींनी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या होत्या. हे सर्व प्रवासी दररोज प्रवास करणारे होते. वाढती प्रवासी संख्या, संभाव्य आपत्ती याबाबत चिंतेतून अनेक सूचना दिल्या गेल्या, पण रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले. परिणामी, लाखो प्रवाशांना जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे.

डोंबिवली पॅसेंजर्स असोसिएशनच्या वतीने २०१३ साली आयोजित केलेल्या परिषदेत रेल्वे मंत्रालयाचे, राज्य सरकारचे, सिडकोचे व कोकण रेल्वेचे अधिकारी तसेच प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी, नगरसेवक आणि आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. या परिषदेत ठाणे-कल्याण समांतर रस्ता, कल्याण-पनवेल उन्नत रेल्वे मार्ग, दिवा-वसई उपनगरी मार्ग घोषित करण्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. परंतु, रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. ९ जूनच्या दुर्घटनेचे दुःख व्यक्त करताना भालचंद्र लोहोकरे यांनी याची आठवण करून दिली.

१९७७ ते १९८२ दरम्यान ठाण्याचे खासदार कै. रामभाऊ म्हाळगी यांनी प्रवासी तक्रारींचे संसदेत सादरीकरण केले. खा. आर. एल. भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. १६ पैकी १३ मागण्या मान्य झाल्या. डोंबिवली लोकलची उपलब्धता, दादरला उपनगरी टर्मिनस दर्जा, उपनगरी रेल्वे भाड्यांवर स्थगिती अशा महत्त्वाच्या मागण्या त्या होत्या. तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी परांजपे समितीच्या शिफारशी मान्य केल्या. पनवेल-दिवा-वसई मार्ग आणि पाचव्या-सहाव्या मार्गाची योजना १९७२ मध्येच झाली होती. प्रत्यक्षात मात्र ती केवळ चार-पाच वर्षांपूर्वीच अस्तित्वात आली. तरीही आजही मेल व एसप्रेस गाड्या जुन्या तिसर्‍या व चौथ्या मार्गावरून धावत आहेत. या बाबींकडे भालचंद्र लोहोकरे यांनी लक्ष वेधले. लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच त्यांना कोपर रोड स्थानकावर थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने फेटाळली. त्यामुळेे डोंबिवली, कर्जत आणि कसारा प्रवाशांना वसई वा पनवेलला जावे लागते. ही अत्यंत त्रासदायक बाब आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी खा. राम नाईक व खा. प्रा. रामभाऊ कापसे यांच्या विनंतीवरून रेल्वेच्या स्वतंत्र उपनगरी विभागाची गरज मांडली होती. जर तो विभाग अस्तित्वात आला असता, तर पनवेल-दिवा मार्गावरून सेवा सुरू होऊन डहाणू ते चर्चगेटपर्यंत लोकल उपलब्ध झाली असती. कर्जत-पनवेल दुहेरी मार्गाचे लाभही मिळाले असते. प्रगती एसप्रेस जशी ठाणे-पनवेल मार्गे जाते, तसे उपनगरी गाड्याही का जाऊ शकत नाहीत, असा सवाल भालचंद्र लोहोकरे यांनी उपस्थित केला. चुंबकीय प्रणाली वापरल्यास दर दीड मिनिटाला लोकल चालवता येईल, यावरही त्यांनी भर दिला.

तत्कालिन ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार रामभाऊ म्हाळगी, खा. प्रा. राम कापसे, खा. राम नाईक यांचा त्वरित पाठपुरावा असायचा. त्यांच्या जोडीला तेव्हा रामभाऊ गडकरी (कर्जत), तसेच भाऊ सबनीस (कल्याण), किसन घारपुरे (ठाणे), श्रीकृष्ण शिदोरे (गोरेगांव), दादा पांडे व शरद भावे, (डोंबिवली) हे कार्यकर्ते सातत्याने काम करीत होते. सध्याचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही खा. रामभाऊ म्हाळगींप्रमाणे प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत व संघटनांनी त्यांना सहकार्य करावे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नियोजनबद्ध सादरीकरण, सातत्यपूर्ण संपर्क ही काळाची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने अनेक मागण्या न मानल्या तरी गेल्या काही वर्षांत स्टेशन स्वच्छता, नवीन डबे, सरकते जिने, फेरीवाले व भिकारी हटवण्याचे काम करण्यात यश मिळाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील असल्यामुळे प्रवाशांच्या समस्या दूर होतील, असा विश्वास भालचंद्र लोहोकरे यांनी व्यक्त केला.

श्रीकांत पावगी