कल्याणात श्री जगन्नाथ रथयात्रा मोठ्या दिमाखात संपन्न ; शेकडो भाविकांची मोठी गर्दी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमलता पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथयात्रेला प्रारंभ

30 Jun 2025 21:51:45

कल्याण, पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर आणि तिथली रथयात्रा ही केवळ देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या पुरी येथील श्री जगन्नाथ रथयात्रेच्या प्रेरणेने कल्याणात निघालेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेलाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कल्याण पश्चिमेचे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार यांच्या हस्ते आरती करून मग श्रीफळ वाढवून या रथयात्रेला प्रारंभ झाला.

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर आणि तिथल्या रथयात्रेची संपूर्ण जगभरात ख्याती आहे. ही रथयात्रा आणि इथल्या मंदिरात श्री जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भक्त येत असतात. ते विचारात घेऊन कल्याण पश्चिमेतील अमृत पार्क येथील इस्कॉन केंद्रातर्फे यंदा कल्याणात श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथील पारनाका श्रीराम मंदिर येथून निघालेली ही रथयात्रा लालचौकी, मोहिंदर सिंग मार्ग, मोहन हाईटस, वायले नगर, पोद्दार स्कूलमार्गे अमृत पार्क येथील इस्कॉन केंद्र येथे या रथयात्रेचा समारोप करण्यात आला.

विशेष म्हणजे पुरी येथील श्री जगन्नाथ रथयात्रेप्रमाणेच कल्याणातील ही रथयात्राही काढण्यात आली. ज्यामध्ये श्री जगन्नाथ आणि श्रीकृष्ण यांच्या जयघोषाने संपूर्ण कल्याण नगरी दुमदुमून गेली होती. कल्याणात प्रथमच निघालेल्या या रथयात्रेमध्ये शेकडो भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

यावेळी कल्याण पश्चिमेतील इस्कॉनकेंद्राचे प्रमुख अनिरुध्द भगवान दास, प्रभानु दास, सीए उत्कर्ष मेहता, सीए निर्मल सिंग , माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार, भाजपच्या प्रदेश सचिव प्रिया शर्मा यांच्यासह इस्कॉनचे अनेक सदस्य आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Powered By Sangraha 9.0