रशियाची युक्रेनवर ४७७ ड्रोन, ६० क्षेपणास्त्रांद्वारे सर्वांत मोठी कारवाई

    30-Jun-2025
Total Views |

मॉस्को : रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा हवाई हल्ला केला आहे. तीन वर्षांपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात हा सर्वांत मोठा हवाई हल्ला आहे. या हल्ल्यात युक्रेनच्या ‘एफ-१६’ लढाऊ विमानाचा पायलट मृत्युमुखी पडला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ‘नाटो’ शिखर परिषदेनंतर रशियाने हा हल्ला केला आहे. या शिखर परिषदेत जगातील शक्तिशाली देशांनी तीन वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध संपवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रशियाने हा मोठा हवाई हल्ला केल्याने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले आहेत की, "रशियाने रात्री ५३७ शस्त्रास्त्रांनी युक्रेनवर हवाई हल्ला केला आहे. त्यात ४७७ ड्रोन आणि ६० क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. रशियन हल्ल्याला निष्क्रिय करण्यात गुंतलेले ‘एफ-१६’ विमानाचे पायलट मॅसिम उस्टेन्को यांचा मृत्यू झाला.

या ‘एफ-१६’ पायलटने सात हवाई लक्ष्ये नष्ट केली. रशियाने ज्या ड्रोनने हल्ला केला, त्यापैकी बहुतेक ड्रोन इराणमध्ये बनवलेले ‘शाहिद’ ड्रोन होते. रशियाने हे हल्ले निवासी भागात केल्याने मोठे नुकसान झाले आहे. स्मिलामधील एक निवासी इमारतीलाही लक्ष्य करण्यात आले आहे.”