कल्याण, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे आणि माेहिली जलशुद्धीकरण केंद्रातील पंप जुने झाले आहेत. त्यामुळे नागरीकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो. हे पंप दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
आमदार भोईर यांनी नुकतीच आयुक्त गोयल यांची भेट घेतली. एकाच वेळी सर्व पंप दुरुस्ती करता येणे शक्य नाही. त्यामुळे पंप दुरुस्तीचे काम टप्प्या टप्प्याने केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी आमदार भोईर यांना दिले आहे. याशिवाय वारकरी भवनासाठी जागा आरक्षित आहे. या वारकरी भवनासाठी सगळ्या वारकऱ्यांनी एकत्रित यावे असे आवाहन आमदार भोईर यांनी केली आहे. या प्रश्नावरही आमदार भोईर यांनी आयुक्तांशी चर्चा केली.
त्याचबरोबर कल्याण स्टेशन परिसरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा स्मार्ट सिटी प्रकल्पात बाधित झाली आहे. बाधित जागा प्रकल्पाच्या रस्ते रुंदीकरणात गेली आहे. त्यामुळे उद्यानाचा आकार कमी झाला आहे. त्याठिकाणी उद्यानासह डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याचा विषय आहे. उद्याानाच्या जागेचे प्रकरण लवादाकडे प्रलंबित आहे. लवादाकडे त्याचा निकाल लागताच हा प्रश्न ही निकाली निघणार असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.