
मुंबई : राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्यासंबंधीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर आता येत्या ५ जुलै रोजी ठाकरे बंधूचा एकत्रित विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही याबाबतची माहिती दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा यांनी केली होती. मात्र, रविवार, २९ जून रोजी राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला. त्यानंतर आता ५ तारखेला ठाकरे बंधूंनी एकत्रित विजयी मेळावा घेण्याची घोषणा केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, "इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. काल २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे आणि त्याबद्दल तमाम मराठी जनांचं मनापासून अभिनंदन. येत्या ५ तारखेला विजयी मेळावा होईल. या विजयी मेळाव्याचे तपशील लवकरच कळवण्यात येतील," असे त्यांनी सांगितले.