कोलकाता : (Kolkata Rape Case) कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २४ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत गार्डसह चार आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांना कॉलेजचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे.सात तासांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने एका खोलीत नेल्याचे स्पष्ट दिसत आहे. या फुटेजमुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
कोलकाता पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी पीडितेला लॉ कॉलेजमध्ये नेण्यात आले होते, जिथे गुन्ह्याच्या घटनेचा बारकाईने तपास करण्यात आला. अशा परिस्थितीत, जेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सिक्युरिटी गार्ड हा घटनास्थळाच्या आसपास फिरताना दिसला. जेव्हा गार्डला याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी गार्डलाही ताब्यात घेतले आहे.
एसआयटी करणार प्रकरणाचा तपास
कोलकाता पोलिसांनी सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांचे विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन केली आहे, जी या प्रकरणाचा तपास करत आहे. एसआयटीकडून सध्या घटनास्थळाची तपासणी सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडितेला तिन्ही आरोपींनी जबरदस्तीने ओढत एका खोलीत नेल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज २५ जूनच्या दुपारी ३:३० ते रात्री १०:३० पर्यंतचे म्हणजेच सुमारे सात तासांचे असून यादरम्यान महाविद्यालयाच्या आवारात घडलेली घटना स्पष्टपणे दिसत आहे. आरोपींना घटनास्थळावरुन एक-एक करून बाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या घटना पीडितेच्या जबाबाशी जुळत असल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले आहे.
वैद्यकीय अहवालात काय आहे?
पीडितेच्या वैद्यकीय अहवालानुसार, पीडितेच्या मानेवर जखमांच्या खुणा आहेत, छातीवर आणि मांड्यांच्या आतील भागातही जखमा दिसून आल्या आहेत. याशिवाय, डॉक्टरांनी बलात्काराची शक्यता नाकारलेली नाही.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\