नमाजवादी आघाडीचा देशात शरिया लादण्याचा अजेंडा - भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा इंडी आघाडीवर घणाघात

    30-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली,
नमाजवादी इंडी आघाडीचा देशात शरिया लागू करण्याचा स्पष्ट अजेंडा आहे, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत केला आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) तेजस्वी यादव यांनी वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ, असे आवाहन केले होते. त्यावरून भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी यावरून तेजस्वी यादवसह संपूर्ण इंडी आघाडीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अलिकडेच आपण आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण केली. पटना येथील गांधी मैदानावर झालेल्या एका रॅलीदरम्यान आपल्या जीवाची पर्वा न करता जमले होते, तेथे इंडी आघाडीचे बिहार नेते तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही संसदेने मंजूर केलेला कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ. यावरून इंडी आघाडीची मानसिकता स्पष्ट झाली आहे.

इंडी आघाडीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली होत असल्याचा आरोप सुधांशू त्रिवेदी यांनी केला. ते म्हणाले, भाजप आणि जदयू समाजवादाच्या बाजूने उभे आहेत. त्याचवेळी राजद आणि सपा सारखे पक्ष नमाजवादाच्या बाजूने उभे आहेत. जर त्यांचे सरकार आले तर ते शरिया लागू करतील. हेच लोक दहशतवाद्यांना संरक्षण देतात, हेदेखील स्पष्ट झाले असल्याचाही टोला त्यांनी लगावला.

काँग्रेससाठी शरिया महत्त्वाचा


काँग्रेस सरकारने शरियाला संविधानापेक्षा अधिक महत्त्व दिले होते. याद्वारे ते दलित, वंचित आणि शोषितांचे आरक्षण खाऊ इच्छितात. एएमयू, जामियामध्ये एससी एसटी ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करून एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यात आले. बंगालमध्ये मुस्लिमांना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात आले. कर्नाटकमध्येही मुस्लिमांना ओबीसी आरक्षण दिले जात आहे. मुल्ला मौलवींचा नमाजवाद हेच काँग्रेसचे धोरण असल्याचीही टिका त्रिवेदी यांनी केली आहे.