सत्तेत आल्यावर वक्फ कायदा रद्द करू - तेजस्वी यादव

    30-Jun-2025   
Total Views |

पाटणा : (Tejashwi Yadav)
"सत्तेत आल्यावर वक्फ कायदा रद्द करू", असा दावा राजद नेते तेजस्वी यादव यांनी रविवार, दि. २९ जून रोजी गांधी मैदानावर आयोजित 'वक्फ वाचवा, संविधान वाचवा' या रॅलीला संबोधित करताना केला. इंडी आघाडीतील घटकपक्षांनी वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती बांधून सभेला हजेरी लावली होती.

यादव म्हणाले, "बिहारमधील सत्ताधारी एनडीए सरकार सत्तेबाहेर जात आहे. म्हणून ते गरीब, दलित आणि अल्पसंख्यांकांचे ह्क्क हिरावून घेऊ इच्छित आहे. परंतु येत्या नोव्हेंबरमध्ये, राज्यात एक नवीन गरिबांच्या हिताचे सरकार स्थापन होईल आणि ते वक्फ सुधारणा कायद्याला रद्द करुन कचऱ्याच्या डब्यात टाकून देईल."

यावर उत्तर देताना, जदयुचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा यांनी राजद अल्पसंख्याक समुदायाचा पाठिंबा मिळवून त्यांचा वापर व्होट बँक वाढवण्साठी करत असल्याचे म्हटले आहे. मुस्लिमांबद्दल राजदची सहानुभूती केवळ आगामी निवडणुकीत मते मिळविण्याची एक युक्ती आहे. बिहारमधील लोकांना राजदची 'घराणेशाही' मानसिकता चांगलीच माहिती आहे, असा टोलाही लगावला आहे.

बिहारमध्ये सत्तेत आल्यास सुधारित वक्फ कायदा रद्द करणार, या राजदच्या तेजस्वी यादव यांच्या विधानावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले, "हे असे लोक आहेत जे संविधानाला दाबण्याचा प्रयत्न करतात. संसदेत बनवलेल्या कायद्याला फक्त तेजस्वी यादव यांच्यासारखे लोकच विरोध करू शकतात. ते लालू यादव यांचे पुत्र आहेत. लालू यादव भ्रष्टाचारात बुडाले होते, असे करताना ते 'परिवारवादी' बनले आहेत, नंतर ते स्वतःला 'समाजवादी' म्हणवू लागले, आता ते 'नवाजवादी' झाले आहेत, आता ते सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहत आहेत, पण ते प्रत्यक्षात येणार नाही, बिहारचे लोक त्यांना कधीही शरिया कायदा लागू करू देणार नाहीत."





अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\