मुंबई, पुण्याची गंगा पुन्हा एकदा नाशिकच्या पर्वतरांगांत अवतरणार असून, त्र्यंबकेश्वराच्या पवित्र कुशीत लाखो भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार आहे. या दिव्य कुंभमेळ्याच्या तयारीसाठी महाराष्ट्र सरकारने १ हजार कोटी रुपयांची निधीओंजळ उचलली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या या पुण्यपर्वाच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात पायाभूत सुविधांपासून धार्मिक सोयी-सुविधांपर्यंत सर्वच क्षेत्रांत भव्य आणि नियोजनबद्ध विकास आराखडा राबवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अर्थमंत्र्यांनी सोमवारी विधानमंडळात सादर केलेल्या ५७ हजार ५०९ कोटी रुपयांच्या पूरक मागण्यांमध्ये या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्मातील चार प्रमुख कुंभांपैकी एक असून, लाखो भाविक दर १२ वर्षांनी या पुण्यसंधीच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळे या वेळेसचा कुंभ अधिक सुसज्ज, सुरक्षित आणि सुव्यवस्थित व्हावा, यासाठी राज्य शासनाने नियोजनाचा एक विस्तृत आणि आधुनिक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सहापदरीकरण, प्रमुख संपर्क मार्गांचे विस्तारीकरण, राष्ट्रीय महामार्गांचे आधुनिकीकरण, आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरती बसस्थानके व शहराबाहेरील पार्किंग हब उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याशिवाय महिलांसाठी स्वतंत्र सुविधा, वृद्ध व दिव्यांगांसाठी सहाय्यता केंद्रे, मोफत आरोग्य तपासणी केंद्रे आणि स्वच्छतागृहांची निर्मितीही केली जाणार आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने कुंड कुशावर्त परिसरात नवीन प्रवेशमार्ग, जलपोलिस, अंडरवॉटर ड्रोन, सीसीटीव्ही यंत्रणा, आणि विशेष पोलिस बंदोबस्ताची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शाही स्नानासाठी नियोजन, धार्मिक कार्यक्रमांसाठी मोकळी जागा, आणि मठ-मंदिरांशी समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र निधीही मंजूर करण्यात आला आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन, रोजगार आणि पायाभूत सुविधा यांना चालना देणारा एक संधीयोग आहे. या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा कुंभानंतरही नागरिकांच्या उपयोगात राहतील. ही गुंतवणूक श्रद्धेच्या सेवेतून विकास घडवणारी आहे.
या महायोजनासाठी ऑगस्ट २०२५ पासून निविदा प्रक्रिया सुरू होणार असून, २०२६ च्या मध्यापर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यक्रम व्यवस्थापन आणि धार्मिक संस्था समन्वयाचे काम पूर्ण होणार असून, कुंभस्नानाच्या काळात डिजिटल नोंदणी आणि माहिती सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूण तरतूद : १,००० कोटी मुख्य पायाभूत कामे (५०० कोटी)
नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गाचे सहापदरीकरण
प्रमुख संपर्क मार्गांचे रुंदीकरण व दुरुस्ती
राष्ट्रीय महामार्ग सुधारणे
कुंड कुशावर्त परिसराचा विशेष प्रवेश आराखडा
वाहतूक व गर्दी नियंत्रण (१५० कोटी)
तात्पुरती बसस्थानके
शहराबाहेरील पार्किंग हब
विशेष बस फेऱ्या
ट्रॅफिक मॉनिटरिंग व सिग्नल यंत्रणा भाविकांसाठी सेवा-सुविधा (२०० कोटी)
महिला, वृद्ध, दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष
सार्वजनिक स्वच्छतागृहे
मोफत आरोग्य तपासणी केंद्रे
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
व्हीलचेअर, मदतीसाठी स्वयंसेवक केंद्रे
सुरक्षा व्यवस्था (१०० कोटी)
जलपोलिस व अंडरवॉटर ड्रोन
सीसीटीव्ही व नियंत्रण कक्ष
पोलीस व होमगार्ड बंदोबस्त
आपत्कालीन आराखडा, मदत केंद्रे धार्मिक आयोजन व समन्वय (५० कोटी)
शाही स्नान मार्गांचे नियोजन
धार्मिक स्थळे व संस्था समन्वय
धर्मशाळा, पंडाल, प्रवचन स्थळांची उभारणी
पूजासाहित्य केंद्रे व माहिती सेवा
महत्त्वाचे टप्पे
ऑगस्ट २०२५ : निविदा प्रक्रिया सुरू
मे २०२६ : रस्ते, वाहतूक, सुरक्षा यंत्रणा पूर्ण
डिसेंबर २०२६ : धार्मिक समन्वय व आयोजन यंत्रणा
जानेवारी २०२७ : भाविक नोंदणी, अॅप व माहिती केंद्र
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.