समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे असा सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला अपवाद म्हणजे. रविंद्र चव्हाण अर्थात रवि दादा ! समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण ते दाखवण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं असतं आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची व "न्यूज सायकल" मध्ये न अडकता आपल्यावर सोपवलेली जबाबदारी कर्तव्यकठोरपणे पार पाडायची, हाच रवि दादांचा नेहमीचा खाक्या आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार रविंद्र चव्हाण यांच्या मनावर बिंबले आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हा ‘रवि’ नावाचा ‘दादा’माणूस उदयाला आला.
गेल्या २५ वर्षांतील रविंद्र चव्हाण यांच्या प्रवासाचा हा मागोवा
२००२ साली भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
२००५ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी
२००७ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदावर विराजमान
२००९ साली नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून दणदणीत विजय
२००९ नंतर २०१४, २०१९ आणि २०२४ असा डोंबिवलीच्या आमदारकीचा विजयी चौकार
यादरम्यान २०१६ साली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी; तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
२०१६ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या ४ खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार
२०२० साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक
२०२२ साली स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या २ खात्यांचा कारभार, तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या २ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीत ‘आनंदाचा शिधा’, ‘रेशन आपल्या दारी’ सारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले.
त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहताना रविंद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रात पायाभूत सेवा-सुविधांची क्रांती घडवली.
मुंबई गोवा हायवेशी निगडीत केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी, बाधित क्षेत्रातील संबंधित भूधारक, वित्तीय संस्था, कंत्राटदार यांच्याशी समन्वय साधून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या महामार्गाचे सर्वाधिक टप्पे विकसित करण्याचे मोठे कार्य केले. विशेष म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अखत्यारीतील या हायवेचे काम पूर्णत्वास नेण्याकरिता लोकभावनेचा आदर करून जातीने लक्ष घातले.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जवळपास ९२ हजार कोटींची रस्ते आणि पूलांची कामे करण्याची किमया रविंद्र चव्हाण यांनी घडवली. या काळात २३ हजार ८८६ किमी लांबीचे रस्ते आणि १ हजार ०५४ पूलांचे बांधकाम पूर्ण झाले असून २९ हजार ०४१ किमी लांबीचे रस्ते आणि १ हजार ७९७ पूलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहेत.
यासोबतच जवळपास ३४ हजार कोटी रक्कमेच्या शासकीय इमारतींचे बांधकाम आणि नूतनीकरण केले, यात प्रामुख्याने न्यायालये, प्रशासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृहे इत्यादीचा समावेश आहे.
रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, विमानतळ यांसारख्या २२ पायाभूत सुविधांच्या उभारणी आणि देखभालीसाठी रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) स्थापन करण्यात आले.

यासोबतच कोकण रेल्वे मार्गावरील १२ प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांना आता विमानतळाचा लुक मिळाला आहे, ती संकल्पना देखील रविंद्र चव्हाण यांचीच !
श्रीराम जन्मभूमी दर्शनासाठी महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी शरयू नदीजवळ अंदाजे ९,५०० चौ.मी. क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या १२ मजली अयोध्या महाराष्ट्र भक्त निवासाचे जमीन अधिग्रहण आणि भूमिपूजन रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातच झाले.
काश्मीर सफरीवर जाणाऱ्या पर्यटकांच्या मोफत निवास सुविधेसाठी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय रविंद्र चव्हाण यांनी घेतला. रविंद्र चव्हाण यांच्या कार्यकाळातच या भवनासाठी जम्मू - काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम येथे जवळपास १०,११७ चौ. मी. जमीन खरेदी करण्यात आली, तसंच यासाठी ९ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आली.
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थयात्रा असणारी अष्टविनायक यात्रा केवळ १ दिवसात करणं मंत्री चंद्रकांत पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांनी शक्य झालं आहे. यासोबतच महाबळेश्वर तालुक्यातील श्री उत्तेश्वर मंदिर, कार्ल्याचं श्री एकविरा आई मंदिर, खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरांचं जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्याचं काम त्यांनी केलं आहे.
रविंद्र चव्हाण कट्टर सावरकरभक्त आहेत. मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा स्थापन करण्यास मोलाचे सहकार्य केले. २०२३ साली या पुतळ्याचे अनावरण मॉरिशसच्या राष्ट्रपतींच्या हस्ते आणि रविदादांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. तसेच गेली ११ वर्षे डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड ज्योत प्रज्वलित आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील नामकरणासाठी २०२१ साली संघर्ष आणि २०२४ साली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व.
मंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांनी असंख्य कामे केली, जी येणाऱ्या काळात पूर्णत्वास गेल्यानंतर महाराष्ट्रवासियांचा प्रवास जलद, सुकर आणि आरामदायी होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या दोन्ही विभागांचे डिजिटलायझेशन घडवले, यातून रविंद्र चव्हाण यांची इनोव्हेटिव्ह वृत्ती दिसून येते.
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संघटन पर्व प्रदेश प्रभारी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदांवर रविंद्र चव्हाण कार्यरत होते.
रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात संघटन पर्व अभियानाच्या माध्यमातून जवळपास दीड लाख सक्रिय सदस्य आणि तब्बल दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीच्या ऐतिहासिक कामगिरीची नोंद, रविंद्र चव्हाण यांच्या सर्वसमावेशक आणि सर्वमान्य नेतृत्व लाभल्यामुळे कार्यकर्त्यांना संघटनेचे काम करण्याची ऊर्जा मिळाली.
कामगार वर्गाच्या आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवत, त्यांचा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी जिंकला आहे. म्हणूनच इंडिगो एअरलाईन्सचे २ हजारांहून अधिक कर्मचारी आणि तब्बल २९ हजारांहून अधिक माथाडी कामगारांनी भाजपा परिवारात प्रवेश केला.
काँग्रेसचे माजी आमदार संग्रामजी थोपटे, शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांसारख्या राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रवि दादांच्या नेतृत्वात भाजपा परिवारात प्रवेश केला.
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्ष पदाची धुरा
युवा पिढी, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांशी संवाद साधण्याचे विलक्षण कसब आणि त्यातून कमावलेला दांडगा जनसंपर्क, तसंच देशहित, जनसेवा आणि पक्षनिष्ठा यासाठी अथक मेहनत हीच रविंद्र चव्हाण यांची कार्यशैली आहे.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे डोंबिवली सारख्या सांस्कृतिक शहराचे प्रतिनिधित्व करत असताना गेली १६ वर्षे ‘डोंबिवलीकर’ मासिकाचे संपादक पद रवि दादांनी भूषवले. संपूर्णतः अराजकीय स्वरुपाचे ‘डोंबिवलीकर’ मासिक म्हणजे कला, क्रीडा, साहित्य, संस्कृतीला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक म्हणून प्रसिद्ध आहे.
डोंबिवली शहर हे घर आणि डोंबिवलीकर हा परिवार’ या भावनेतून चव्हाण यांनी ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ उभारला आहे. डोंबिवलीकरांमधल्या कलागुण आणि क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी डोंबिवलीकर सुपर सिंगर पुरस्कार’, ‘डोंबिवलीकर सुपर डान्सर पुरस्कार’ असे गुणगौरव सोहळे, तसंच ‘डोंबिवलीकर मासिक’, ‘डोंबिवलीकर दिनदर्शिका’, ‘डोंबिवलीकर स्टुडिओ’ असे विविध उपक्रम रविंद्र चव्हाण राबवतात. प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकरांचा गेली १५ वर्षे ‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कारा’ने गौरव करण्यात येतो. रविंद्र चव्हाण यांच्या दूरदर्शी आणि व्यापक नेतृत्वामुळेच ‘डोंबिवलीकर’ हा जगाच्या पाठीवर एक ब्रँड म्हणून उदयाला आला आहे.
प्रत्येक वयोगटाच्या गरजा ओळखून डोंबिवलीकर रोझ फेस्टिव्हल, डोंबिवलीकर किलबिल फेस्टिव्हल असे विविध उपक्रम रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने दरवर्षी होत असतात. तसेच डोंबिवलीचा मानबिंदू ठरलेली दहीहंडी, गणेशोत्सव, नमो रमो नवरात्री असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात रवि दादा कायमच अग्रस्थानी असतात.
जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे झालेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून डोंबिवलीत भव्य श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृतीची निर्मिती, या प्रतिकृतीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी’च्या माध्यमातून संरक्षण दलामध्ये करियर घडवण्यास उत्सुक असलेल्या युवा पिढीसाठी विनामूल्य प्रशिक्षणाची सुविधा.
इंडस्ट्री आणि एज्युकेशन यातील गॅप मिटवण्यासाठी स्थापन केलेल्या ‘डिजिटल अकॅडमी’च्या माध्यमातून अग्रगण्य कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरीच्या थेट संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ.
जपूया आरोग्याशी मैत्री’ हा संदेश देण्यासाठी ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’ ही डोंबिवली शहरातील पहिली हाफ मॅरेथॉन .
सैनिकांच्या सन्मानार्थ गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली अशी ६५ किमी लांबीची ‘एक दौड जवानांसाठी G2D मॅरेथॉन.
राजकारणात सहसा बघायला न मिळणारा हळवेपणा ही रविंद्र चव्हाण यांची खासियत... त्यांच्याकडे आलेला प्रत्येकजण समाधानी वृत्तीनेच परत जातो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांचा घराच्या जागेचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवायला काही टेक्निकल अडचणी होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबारात ज्यावेळी ही गोष्ट रविंद्र चव्हाण यांना कळली, तेव्हा त्यांनी पुढचा मागचा विचार न करता स्वतःच्या मालकीची जमीन त्या कातकरी कुटुंबीयांना दान केली.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना विचारधारेशी एकनिष्ठता, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत, उत्तम संवाद कौशल्य आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर गेल्या २५ वर्षांमध्ये चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा प्रवास केला आहे.
या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा परिवारातील श्रेष्ठींनी रविंद्र चव्हाण यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला.
संपूर्ण महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, पर्यावरण, वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, संस्कृती अशा अनेक विषयांवर तळमळीने काम करताना, रविंद्र चव्हाण यांनी आपली ‘मॅन ऑफ मिशन ही उपाधी सिद्ध केली आहे. यापुढे देखील रविंद्र चव्हाण असेच उत्तुंग भरारी घेत राहतील असा विश्वास भाजपला आहे.