नवी दिल्ली, कर्नाटकात नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, नेतृत्वबदलाचा निर्णय हायकमांड घेणार असे सांगून चर्चेस आणखी धार दिली आहे.
मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेल्या वादाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हैसूरमध्ये प्रसारमाध्यमांना एकत्रच सामोरे गेले. यावेळी सिद्धरामय्या म्हणाले की, सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल. त्यांनी डीके शिवकुमार यांच्याशी हस्तांदोलन केले. त्याचवेळीकर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला पक्षाच्या आमदारांशी बोलण्यासाठी बंगळुरूला पोहोचले आहेत.
राज्यातील सिद्धरामय्या यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे आता सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होऊन डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे, असा एक प्रवाह कर्नाटक काँग्रेसमध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवर खर्गे यांच्या विधानास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबई मनपाविषयी मुंबईत निर्णय होणार – रमेश चेन्निथला
काँग्रेस मुख्यालयात सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढावे; असा मतप्रवाह कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, याविषयीचा निर्णय ७ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याचप्रमाण राज ठाकरे यांच्या उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत या भूमिकेशी काँग्रेस सहमत नसल्याचेही ते म्हणाले.