उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेल्या व्यक्तीनेच हिंदीचा निर्णय घेतला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    30-Jun-2025
Total Views |


मुंबई : उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेल्या व्यक्तीनेच पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी तो अहवाल स्विकारला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रवींद्र चव्हाण यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित यायचे असल्यास त्या दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा जीआर मी काढलेला नाही. याऊलट उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात जो अहवाल आला होता तो लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेला उपनेता होता. पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा असे या अहवालात लिहीले आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्विकारला. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने घुमजाव केला. तरीसुद्धा आम्ही कुठलाही इगो न मानता त्यासंदर्भातील निर्णय केला असून त्याबाबत समिती तयार केली आहे. आम्ही कुठल्याही पक्षाचे हित बघणार नाही. आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे हित बघू. जे विद्यार्थ्यांच्या हिताचे असेल तोच निर्णय हे सरकार घेईल. कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केली.


राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारावा!

"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येत असतील तर आम्हाला आनंद आहे. त्यांनी जरूर एकत्र यावे. परंतू, राज ठाकरे जो प्रश्न आम्हाला विचारतात तोच त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारायला हवा. तुमच्या काळात पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला? हा प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्रित यावे, क्रिकेट खेळावे, हॉकी खेळावी, टेनिस खेळावी, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काहीही अडचण नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.