"काँग्रेस कशीही लढली तरी..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला
30-Jun-2025
Total Views |
मुंबई : काँग्रेस कुणाच्या सोबत लढो किंवा स्वबळावर लढो त्याचा परिणाम आधीच ठरलेला आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. रवींद्र चव्हाण यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काँग्रेस कुणाच्या सोबत लढो किंवा स्वबळावर लढो त्याचा परिणाम आधीच ठरलेला आहे. कारण काँग्रेसने जनतेत जाणे सोडले असून जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांपासून काँग्रेस तुटलेली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला जमिनीवर काय सुरु आहे याची कल्पनाच नाही. ते एका अशा नंदनवनात बागडत असतात ज्यामुळे ते अजूनही ईव्हीएमच्या पलीकडे जात नाहीत. अजूनही निवडणूक आयोगाला शिव्या देतच आपण हारण्याचे समर्थन करतात. त्यामुळे जोपर्यंत ते जनतेत जात नाही तोपर्यंत कसेही लढले तरी त्यांची अवस्था तीच राहील," अशी टीका त्यांनी केली.
"भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक रचना ही निवडणूकीच्या माध्यमातून होत असते. मागच्या काळात पहिल्यांदा १२०० पेक्षा जास्त मंडल गठित करण्याचे काम महाराष्ट्रात झाले. त्यानंतर संघटनात्मक ८० जिल्ह्यांचे अध्यक्ष निवडण्याचे काम पूर्ण झाले आणि आता प्रदेशाध्यक्ष पदाकरिता निवडणूक सुरु झाली आहे. आज केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे निवडणूक निरीक्षक म्हणून इथे आले असून त्यांच्यासमोर आम्ही रवींद्र चव्हाण यांचे नामांकन दाखल केले आहे. मागच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचे अध्यक्षपद निभावले. दीर्घ प्रवास करत त्यांनी संघटना बांधली. त्याचे प्रत्यंतर विधानसभेच्या निवडणूकीत पाहायला मिळाले. त्यानंतर आता आम्ही रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल केला असून आमचे निरीक्षक पुढील कारवाई करतील. उद्या संध्याकाळी ५ वाजता या संदर्भातील अधिकृत घोषणा होईल. आमच्या संपूर्ण पक्षाने रवींद्र चव्हाण यांना पाठींबा दिला आहे. महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि केंद्रीय टीम मुंबई संदर्भात पुढचा निर्णय करतील," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोकणात पक्षाच्या विस्तारात रवींद्र चव्हाणांचा मोलाचा वाटा!
ते पुढे म्हणाले की, "गेल्या काळात कोकणात आमचा विस्तार अतिशय चांगल्या पद्धतीने झाला आहे. यामध्ये रवींद्र चव्हाण यांचा एक विशेष मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचे काम हे केवळ कोकणापुरते मर्यादित नसून महाराष्ट्रातही त्यांनी महामंत्री म्हणून काम केले आहे. कोकणात आमच्या विस्ताला खूप स्कोप आहे. महायूती असल्याने आम्हाला काही ठिकाणी मर्यादा आहेत. पण आम्हाला संघटन वाढवण्यास मनाई नाही. त्यामुळे कोकणातल्या कानाकोपऱ्यात आमचे संघटन उभे राहील," असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.