मुंबई : (Harshwardhan Sapkal) "आघाडीच्या तडजोडींमुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत जिल्हा आणि तालुका कमिट्यांना आघाड्यांबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले जातील", असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अलिबाग येथील युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरानंतर माध्यमांशी संवाद साधतेवेळी केले आहे.
पक्षाला योग्य पद्धतीने संधी मिळू शकली नाही, हे वास्तव - सपकाळ
"राज्यात आज युत्या-आघाड्यांची अपरिहार्यता आहे. पण या युती आणि आघाडीची किंमत काँग्रेस पक्षाला चुकवावी लागली आहे. क्षमता असूनही पक्षाला निवडणुका स्वबळावर लढवता आल्या नाहीत. पक्षाला योग्य पद्धतीने संधी मिळू शकली नाही, हे वास्तव आहे. पण आगामी काळात यात गुणात्मक बदल कसे करता येतील, यासाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचे काम पक्षाने सुरू केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांबाबत जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देणार आहोत", असे ते यावेळी म्हणाले.
ते म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका कधी होतील याबाबत अजून स्पष्टता नाही. पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आम्ही लढलो. आज देखील आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी कटीबद्ध आहोत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये आघाडी करण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हा आणि तालुका कमिट्यांकडे असणार आहे. याची पूर्व कल्पना आम्ही मित्रपक्षांना दिली आहे. जिल्हा आणि तालुका समित्या जो निर्णय घेतील त्यांना बळ देण्याचे काम प्रदेश पातळीवरून केले जाईल",असेही हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\