एसटीचे आगाऊ आरक्षण करा, मिळवा १५ टक्के सूट

Total Views |

मुंबई : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या म्हणजेच १५० किमीपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

१ जुनला एसटीच्या ७७व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.

आषाढी एकादशी व गणपती उत्सवात प्रवाशांना लाभ

येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो . राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत उद्यापासून (१जुलै) लागू होत आहे. तथापि जादा बसेस साठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

इ-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ

मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर , npublic.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना १५ टक्के सवलत प्राप्त करता येऊ शकते.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.