"१५० हून अधिक काँग्रेस खासदार सोव्हिएत रशियाचे एजंट..." CIAच्या हवाल्याने निशिकांत दुबे यांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

30 Jun 2025 16:17:22

नवी दिल्ली : (BJP MP Nishikant Dubey) भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी अमेरिकेच्या गुप्तचर संस्था म्हणजेच सीआयएच्या (CIA) २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका दस्तऐवजाचा हवाला देत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. दिवंगत काँग्रेस नेते एचकेएल भगत यांच्या नेतृत्वाखाली १५० हून अधिक काँग्रेस खासदारांनी सोव्हिएत रशियाचे एजंट म्हणून काम केले आणि याकरिता काँग्रेसला रशियाकडून निधी मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या अहवालाचा हवाला दिला आहे, जो त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरील पोस्टसोबत शेअर केला आहे.

हे वाचलंत का? - सत्तेत आल्यावर वक्फ कायदा रद्द करू - तेजस्वी यादव


'काँग्रेस, भ्रष्टाचार आणि गुलामगिरी'

'काँग्रेस, भ्रष्टाचार आणि गुलामगिरी' असे कॅप्शन देत निशिकांत दुबे यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, "सीआयएचा हा गुप्त दस्तऐवज २०११ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार, दिवंगत काँग्रेस नेते एचकेएल भगत यांच्या नेतृत्वाखाली १५० हून अधिक खासदार सोव्हिएत रशियाच्या पैशावर जगत होते. ते रशियाचे एजंट म्हणून काम करत होते का?" त्या काळातील भारतीय माध्यमांचा मोठा भाग सोव्हिएत प्रभावाखाली होता असा आरोपही त्यांनी केला. दुबे यांच्या मते, "पत्रकारांचे गट त्यांचे दलाल होते तसेच रशियाच्या वतीने भारतात १६,००० हून अधिक बातम्या प्रकाशित झाल्याचा उल्लेख आहे."त्यांनी सांगितले की, त्यावेळी रशियन गुप्तचर संस्थेचे १,१०० एजंट भारतात सक्रिय होते, जे नोकरशाही, व्यावसायिक संघटना, कम्युनिस्ट पक्ष आणि मतप्रदर्शकांना त्यांच्या नियंत्रणाखाली ठेवत होते आणि भारताच्या धोरणांवर प्रभाव पाडत होते.


हा देश होता की गुलाम, दलाल आणि मध्यस्थांची कठपुतळी?

निशिकांत दुबे यांनी पुढे म्हटले की, "काँग्रेस उमेदवार सुभद्रा जोशी यांनी निवडणुकीच्या नावाखाली जर्मन सर्कारकडून ५ लाख रुपये घेतले आणि पराभवानंतर त्या इंडो-जर्मन फोरमच्या अध्यक्ष झाल्या. हा देश होता की गुलाम, दलाल आणि मध्यस्थांची कठपुतळी? काँग्रेसने उत्तर द्यावे. आजच याची चौकशी व्हायला हवी की नाही?" असे म्हणत या संपूर्ण मुद्द्यावर निशिकांत दुबे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.




Powered By Sangraha 9.0