आणीबाणीच्या काळात संविधानाची हत्या ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल; न्यायव्यवस्थेलाही गुलाम बनवण्याचा होता हेतू

    30-Jun-2025
Total Views |

नवी दिल्ली :"भारतात आणीबाणी लागू करणार्‍यांनी केवळ आपल्या संविधानाची हत्या केली नाही; तर न्यायव्यवस्थेलाही त्यांचे गुलाम बनवण्याचा त्यांचा हेतू होता. या काळात लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. शेवटी, जनतेचा विजय झाला, आणीबाणी उठवण्यात आली आणि आणीबाणी लादणार्‍यांचा पराभव झाला. अनेक लोकांना कठोर छळ करण्यात आला. ‘मिसा’अंतर्गत कोणालाही अटक करता येत होती. विद्यार्थ्यांनाही त्रास दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्यात आला,” असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आपल्या ‘मन की बात’ या १२३व्या कार्यक्रमात ते आकाशवाणीवरून बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुम्ही सर्वांनी योगाच्या ऊर्जेने आणि ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या’ आठवणींनी भरलेले असले पाहिजे. यावेळीही दि. २१ जून रोजी देश आणि जगातील कोट्यवधी लोकांनी ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’त भाग घेतला. आता दहा वर्षांत, हा ट्रेंड दरवर्षी अधिक भव्य होत आहे. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनार्‍यावर तीन लाख लोकांनी एकत्र योगा केला. तेथे दोन हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी १०८ मिनिटे १०८ सूर्यनमस्कार केले. हिमालयातील बर्फाळ शिखरे आणि आयटीबीपीचे सैनिक, तिथेही योग केला गेला. न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, पॅरिस, जगातील प्रत्येक मोठ्या शहरातून योग दिन साजरा झाला.

बोडोलॅण्डच्या फुटबॉल स्पर्धेचा उल्लेख

आसामच्या बोडोलॅण्डबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, "बोडोलॅण्ड आज एका नवीन रूपात देशासमोर उभा आहे. येथील तरुणांमध्ये असलेली ऊर्जा आणि आत्मविश्वास फुटबॉलच्या मैदानावर सर्वांत जास्त दिसून येतो. बोडोलॅण्ड सीईएम कप आयोजित केला जात आहे. ही केवळ एक स्पर्धा नाही; तर ती एकता आणि आशेचा उत्सव बनली आहे. तीन हजार, ७०० पेक्षा अधिक संघ, सुमारे ७० हजार खेळाडू आणि त्यात सहभागी होणार्‍या आमच्या मुलींची संख्या मोठी आहे. हे आकडे बोडोलॅण्डमधील मोठ्या बदलाची गोष्ट कहाणी सांगतात.”

तीर्थक्षेत्रे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’चे प्रतिबिंब

मोदी म्हणाले की, "उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, तीर्थक्षेत्रे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेचे प्रतिबिंब आहेत. धार्मिक यात्रा या सेवेच्या संधीचा महा-अनुष्ठान असतात. जेवढे लोक यात्रेत जातात, त्याहून अधिक लोक त्यांच्या सेवेत गुंततात. बर्‍याच कालावधीनंतर कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाली आहे. हिंदू, बौद्ध, जैन परंपरेत कैलासला श्रद्धेचे केंद्र मानले गेले आहे. जेव्हा कोणी तीर्थयात्रेला जातो, तेव्हा मनात एक भावना येते, ‘चलो बुलावा आया हैं’ हीच भावना आपल्या धार्मिक यात्रांचा आत्मा आहे.