"उद्धव ठाकरे आणि उबाठा गट आता..."; मंत्री आशिष शेलारांची टीका
30-Jun-2025
Total Views |
मुंबई : त्रिभाषा सूत्री आणि हिंदी भाषेचा मुद्दा आम्ही प्रतिष्ठेचा केला नाही. ज्यांनी हा राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा केला ते उद्धव ठाकरे आणि उबाठा गट आता साफ तोंडावर आपटले आहेत, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. सोमवार, ३० जून रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "खऱ्या अर्थाने मराठी मनाशी, मराठी भाषेशी आणि मराठी माणसाशी महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने संपूर्ण निष्ठा राखली आहे. आम्ही हा प्रतिष्ठेचा मुद्दाच केला नाही. ज्यांनी हा राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा केला ते उद्धव ठाकरे आणि उबाठा गट आता साफ तोंडावर आपटले आहेत."
"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची महाराष्ट्रात कारवाई करण्यासाठीचा निर्णय उद्धवजी मुख्यमंत्री असताना घेतला. तसेच त्यांनी एक गट तयार केला. माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली, असलेल्या या गटात त्यांनी कदम यांच्या रूपात स्वतःच्या पक्षाचा हस्तकही ठेवला. त्यामुळे यामध्ये थेट उबाठा सेनेचा हात असल्याचे स्पष्ट होते. या संपूर्ण लढाईत महाराष्ट्र, मराठी माणूस आणि भाजप जिंकला. आम्ही मराठीबद्दल निर्णय करून दाखवला. हिंदू, हिंदूत्व आणि हिंदुस्तानी भाषेबद्दल प्रखर लढाई आम्हीच लढलो. त्यामुळे कट्टर मराठी आणि प्रखर हिंदूत्ववादी लढाईमध्ये भारतीय जनता पार्टीच जिंकली," असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे घाबरलेलल्यांचे शिरोमणी!
"जे अस्तित्वासाठी घाबरले आणि दुसऱ्या पक्षाच्या दरवाजात गेले. स्वत:च्या पक्षात लोकं टिकवू शकले नाही म्हणून घाबरले आणि लोकांसमोर असत्य सांगू लागले. ज्यांच्यात एकटे निवडणूक लढवण्याची ताकद नाही म्हणून घाबरलेत या तिन्हीचे उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे घाबरलेलल्यांचे शिरोमणी आहेत," अशी टीकाही त्यांनी केली. हर्षवर्धनजींनी आपण मूर्ख ठरणार नाही याची काळजी घ्यावी!
"हर्षवर्धन सपकाळ आपण अध्यक्ष पदावर आहात. आपल्याला अजून अभ्यास करावा लागेल. १९६५ आणि १९६८ ला बनलेल्या शैक्षणिक अभ्यास गटाच्या अहवालात त्रिभाषा सूत्री आणि हिंदीचा उल्लेख सापडतो. हर्षवर्धनजींच्या गावातही ते नाही. सनसनाटी बोलून आपलं वक्तव्य येऊ शकेल, पण लोकांमध्ये आपण मूर्ख तर ठरणार नाही ना याची काळजी घ्यायला हवी," असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.