वॉशिंग्टन : अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा जाहीरपणे टीका केली आहे. ट्रम्प सरकारने नव्याने आणलेल्या कर आणि खर्च धोरण विधेयकाविरोधात मस्क यांनी आवाज उठवला आहे. वेडेपणातून हा विनाशकारी निर्णय घेतल्याचे मस्क म्हणाले.
मस्क हे ट्रम्प यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी मानले जात, परंतू मस्क आता ट्रम्प यांच्या नव्या धोरण विधेयका विरोधात जाहीरपणे विरोध करताना दिसून येते. मस्क यांच्या मते, ट्रम्प सरकारने आणलेल्या नवीन कर आणि खर्च धोरणात अश्या अनेक तरतूदी आहेत. ज्याचा थेट परीणाम हा अमेरिकेतील आर्थिक आणि सामाजिक स्तरावर होऊ शकतो.
हे तर धोक्याचे विधेयक : एलन मस्क
मस्क यांनी केलेल्या दाव्यानुसार, ट्रम्प सरकारचे कर आणि खर्च धोरण विधेयक हे अमेरिकेतील प्रत्येक क्षेत्रासाठी घातक आणि धोक्याचे ठरणारे आहे. भविष्यात उद्योगांना हानी पोहचवणारे हे विधेयक आहे. अमेरिकेत झपाट्याने वाढत असलेले एआय क्षेत्र, हरीतऊर्जा क्षेत्र, तंत्रज्ञान क्षेत्र यांच्यावर या विधेयकाचा थेट परिणाम होऊ शकतो, असा मस्क यांचा दावा आहे.
दरम्यान, ४ जुलै पर्यंत हे विधेयक मंजूर करून घ्या, असा स्पष्ट आदेश ट्रम्प यांनी आपल्या खासदारांना दिला आहे. दोन्ही सभागृहातील ट्रम्प समर्थक खासदारांची संख्या पाहता विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. ट्रम्प सरकारने हे विधेयक म्हणजे 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा एक महत्वाचा भाग असल्याचे म्हटले आहे. ज्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय सीमा सुरक्षित करणे, सुरक्षा खर्च वाढवणे आणि अमेरिकेतील घुसखोरांना हटवणे ही या विधेयकातील प्रमुख उदीष्ट्य आहेत.
विधेयकात दरवर्षी १० लाखापेक्षा जास्त घुसखोरांना हद्दपार करण्याची योजना आहे. हे विधेयक म्हणजे एका प्रकारे अमेरिकेच्या इतिहासातील घुसखोरांना हद्दपार करणारी सर्वात मोठी मोहीम असेल. मस्क यांच्याप्रमाणेच अमेरिकेतील अन्य उद्योगपती, NGO संस्था, विरोधी पक्षातील खासदारांनी यांवर चिंता व्यक्त करत ट्रम्प सरकारवर टीका केली आहे.