दिल्लीतील १५ वर्षे जुनी वाहने कालबाह्य ; पेट्रोल बंदी, चालवण्याचीही परवानगी नाही; ‘सीएनजी’ वाहनांना दिलासा

    30-Jun-2025
Total Views |

नवी दिल्ली : राजधानीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने जुन्या वाहनांवर मोठे पाऊल उचलले आहे. दि. १ जुलै रोजीपासून दहा वर्षांपेक्षा जुन्या डिझेल कार आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल कारना दिल्लीत इंधन मिळणार नाही आणि त्यांना चालवण्याची परवानगीही मिळणार नाही. म्हणजेच, पेट्रोल पंपांवर या वाहनांसाठी पूर्णपणे प्रवेशबंदी असणार आहे. याशिवाय, जर असे वाहन आढळले तर ते ताबडतोब जप्त केले जाणार आहे.

दिल्ली सरकारच्या नवीन निर्णयात १५ वर्षांपेक्षा जुन्या ‘सीएनजी’ वाहनांना सध्या सूट देण्यात आली आहे. म्हणजेच, जर तुमची कार सीएनजीवर चालते आणि तिचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला इंधन मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या बंदीची व्याप्ती फक्त डिझेल आणि पेट्रोल वाहनांपुरती मर्यादित असणार आहे.

सरकारने म्हटले आहे की, या जुन्या वाहनांची ओळख ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (एएनपीआर)’ कॅमेर्‍यांनी केली जाईल, जे दिल्लीतील सर्व पेट्रोल आणि ‘सीएनजी’ पंपांवर बसवण्यात आले आहेत. एखादे वाहन इंधन स्टेशनमध्ये प्रवेश करताच कॅमेरा त्याची नंबर प्लेट स्कॅन करून वाहनाचा नोंदणी, इंधन प्रकार आणि वय थेट वाहन पोर्टलवरून तपासेल. जर ते वाहन निर्धारित निकषांनुसार ‘एंड-ऑफ-लाईफ (ईओएल)’ श्रेणीत आले; तर पेट्रोल पंप ऑपरेटरला ताबडतोब अलर्ट मिळेल आणि त्या वाहनाला इंधन नाकारले जाईल. तसेच, ते जागेवरच जप्त केले जाणार आहे.