"तुम्ही कमल हसन असाल, पण जनभावना दुखावण्याचा अधिकार नाही"; उच्च न्यायालयाने अभिनेत्याला का झापले? वाचा संपूर्ण प्रकरण

"तुम्ही कमल हसन असाल, पण जनभावना दुखावण्याचा अधिकार नाही" – कर्नाटक उच्च न्यायालयाची तंबी!

    03-Jun-2025   
Total Views |


you may be kamal haasan, but you have no right to hurt public sentiments karnataka high court warns

मुंबई : तामिळ अभिनेते आणि राजकीय पक्ष मक्कल निधी मय्यम (MNM) चे प्रमुख कमल हसन यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. त्यांनी नुकतेच ''कन्नड ही तामिळ भाषेपासून जन्मलेली आहे'' असे वक्तव्य चेन्नईत त्यांच्या आगामी थग लाइफ या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात केले होते, ज्यामुळे कर्नाटकमध्ये मोठा वाद निर्माण झाला.

मंगळवारी या प्रकरणात सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, ''तुम्ही कमल हसन असाल किंवा इतर कोणी, जनतेच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नाही.'' न्यायालयाने यावर अधिक कठोर भूमिका घेत, ''देशाचे विभाजन हे भाषिक आधारावर झाले आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक व्यक्तींनी जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. यामुळे सामाजिक असंतोष व मतभेद निर्माण होतात,'' असे मत नोंदवले.

न्यायालयाचा रोष: 'इतिहासतज्ज्ञ आहात का?
न्यायालयाने कमल हसन यांना थेट विचारले, ''तुम्ही हे विधान कोणत्या आधारावर केले? तुम्ही इतिहासतज्ज्ञ आहात का? भाषातज्ज्ञ आहात का?'' असा प्रश्न विचारत त्यांच्या वक्तव्याचा आधार विचारला.

पुढे उदाहरण देत न्यायालयाने सांगितले की, ''राजगोपालाचार्य यांनीही ७५ वर्षांपूर्वी असाच दावा केला होता आणि त्यानंतर त्यांनी क्षमा मागितली होती. तसंच कमल हसन यांच्याकडूनही क्षमायाचना अपेक्षित होती. मात्र त्याऐवजी त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी न्यायालयात संरक्षण मागितले.''

थग लाइफ हा बहुचर्चित चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर, कमल हसन यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात त्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत व्हावे यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने त्यावर टीका करत म्हटले, ''तुमच्या स्वतःच्या चित्रपटासाठी पोलीस यंत्रणेचे साहाय्य हवे, पण जनतेची भावना दुखावल्याबद्दल एक साधे 'क्षमस्व' म्हणणे शक्य नाही?''
यावर न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, ''संविधानिक अधिकारांखालील अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जनभावना दुखावण्यासाठी वापरता येणार नाही.''
कमल हसन यांची बाजू आणि KFCC चा विरोध
कमल हसन यांच्या ‘राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल’ या निर्मिती संस्थेने दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, हसन यांचे विधान "तमिळ आणि कन्नड जनतेमधील सांस्कृतिक ऐक्य" अधोरेखित करण्याच्या हेतूने केले गेले होते. हे विधान कन्नड सुपरस्टार शिवराजकुमार यांच्या उपस्थितीत, सौहार्दपूर्ण वातावरणात झाले होते. मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (KFCC) ने यावर कठोर भूमिका घेतली असून त्यांच्या अध्यक्षांनी म्हटले आहे, ''जोपर्यंत कमल हसन सार्वजनिक माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही थग लाइफ चे प्रदर्शन कर्नाटकमध्ये होऊ देणार नाही.'' त्यांनी अजून स्पष्ट केले की, ''आम्ही कायदेशीरदृष्ट्या काहीही गैर केलेले नाही. कमल हसन कोर्टात गेले तरी आम्ही आमचा निर्णय बदलणार नाही.''
 
Thug Life हा चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा उच्च बजेटमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या चित्रपटात कमल हसन यांच्यासोबत त्रिशा कृष्णन, सिलंबरासन आणि इतर दिग्गज कलाकार आहेत. ऑस्कर विजेता ए. आर. रहमान यांनी संगीत दिले असून, सुमारे ३०० कोटींचा खर्च यावर झालेला आहे. हा चित्रपट कमल हसन आणि मणिरत्नम यांची नायक्कन नंतरची दुसरी मोठी जोडी म्हणून पाहिला जातो आहे.


कमल हसन यांचे विधान आणि त्यावरून निर्माण झालेला वाद भाषिक अस्मिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जबाबदारी या त्रिसंधीवर प्रकाश टाकतो. न्यायालयाने व्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादा अधोरेखित करत जनभावनांचा आदर करण्याचा संदेश दिला आहे. या वादातून चित्रपटाचे प्रदर्शन कशा प्रकारे पार पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.