कोलकाता : (Sharmistha Panoli Arrest Case) कोलकाता पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला तुरूंगात मूलभूत सुविधा नाकारल्या गेल्याचा आणि तिला धमक्या मिळाल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे. शर्मिष्ठाचे वकील मोहम्मद समीमुद्दीन यांनी यासंदर्भात अलीपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच न्यायालयाने ४ जूनपर्यंत या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
वकील मोहम्मद समीमुद्दीन यांनी याचिकेत म्हटले आहे की, "अलीपूर महिला सुधारगृहात योग्य स्वच्छता राखली जात नाही. माझ्या अशीलाला मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. शर्मिष्ठाला किडनीचा आजार आहे. तिची तब्येत ठीक नाही. तिला तुरुंगातील इतर कैद्यांकडून धमक्या मिळत आहेत. यामुळे तिला तिच्या सुरक्षिततेची भीती वाटते. या धमक्या असुरक्षितता निर्माण करणाऱ्या आहेत. या सगळ्याचा तिच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. आम्ही सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी न्यायालयीन कोठडीत तिच्यासाठी स्वतंत्र खोलीची मागणी केली आहे आणि तिच्या किडनीच्या आजार आणि स्वच्छतेच्या गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र बाथरूम वापरण्याची परवानगी देण्यात यावी", यासाठी मागणी केली असल्याचे ते म्हणाले.
"१३ जूनपूर्वी आम्ही तिला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तिला वर्तमानपत्रे आणि मासिके वाचण्याची परवानगी नाही. आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे जेणेकरून तिला तिचे मूलभूत हक्क मिळावेत. शर्मिष्ठा निर्दोष आहे. तिला जामिनावर सोडण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत", असे वकील समीमुद्दीन यांनी म्हटले आहे.