मुंबई : बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात मस्सोजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी मंगळवार ३ जून रोजी पार पडली. यावेळी या घटनेतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मला मकोकातून दोषमुक्त करा, असा युक्तीवाद केला आहे. दरम्यान, सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांनी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना वकील उज्वल निकम म्हणाले की, "आरोपी वाल्मिक कराडची चल आणि अचल मिळकत जप्त करण्याचा आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता. त्यावर आता वाल्मिक कराडने वकीलांच्या मार्फत उत्तर दिले आहे. १७ जून रोजी त्या अर्जाची चौकशी होईल आणि माझे सहकारी अॅड. कोल्हे सुनावणी करतील. तसेच या खटल्यात मला मकोकातून दोषमुक्त करावे, असा वाल्मिक कराडचा अर्ज होता. तर वाल्मिकला दोषमुक्त करावे किंवा त्याच्यावर आरोप निश्चित करावे, याबाबतचा निर्णय एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा, असे आम्ही न्यायालयाला प्रस्तावित केले."
हे वाचलतं का? - महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना! राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय
"यावर न्यायालयाची आणि बचाव पक्षाची हरकत होती. त्यामुळे सुरुवातीला वाल्मिक कराडला मकोकातून मुक्त करावे, या अर्जावर चौकशी व्हावी, असे बचाव पक्षातर्फे सांगण्यात आले. त्याला आम्ही हरकत नाही असे म्हणालो. त्यामुळे आता वाल्मिक कराडवर मकोकाच्या तरतूदी लागू होतात की, नाही याबाबत १७ तारखेनंतर युक्तीवाद होईल," असे त्यांनी सांगितले.