कोल्हापूर : ठाकरे बंधू एकत्र यावे ही आमची प्रामाणिक ईच्छा आहे, असे म्हणत उबाठा गटाकडून पुन्हा एकदा यूतीकरिता मनसेला साद घालण्यात आली आहे. सोमवार, २ मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असताना उबाठा गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सुनील प्रभू म्हणाले की, "ठाकरे बंधू एकत्र यावे ही आमची प्रामाणिक ईच्छा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची ईच्छा आहे की, दोन्ही बंधूंनी एकत्र यावे. महाराष्ट्राच्या मनात असलेले भविष्यात होईल, असे मला वाटते. दोन भावांच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही. ते दोघेच ठरवतील. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे त्या दोघांनाही कळते," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - वाल्मिक कराडवर मकोका लागणार की, नाही? उज्वल निकम यांची महत्वपूर्ण माहिती; कोर्टात काय घडलं?
ते पुढे म्हणाले की, "प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष या निवडणूकांमध्ये पुढे कसे जाऊ, यादृष्टीने प्रयत्न करतो. कार्यकर्ता हे पक्षाचे बळ असतो. त्यामुळे कार्यकर्त्याशी हितगुज करून आणि त्याचे मत समजून घेऊन पुढे जाणे हा राजकारणातील शिष्टाचार आहे. शिवसेनाप्रमुखांचा करिष्मा मोठा आहे. शिवसैनिकांमध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची शक्ती आहे. राजकीय यश अपयश येत असते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विधानसभेत कमी जागा मिळाल्या असल्या तरी येणाऱ्या काळात हाच लोकांच्या मनातील पक्ष आहे, असे मला वाटते," असेही ते म्हणाले.