मुंबई : “महाराष्ट्रातील सोसायटीत जबरदस्तीने बकरा कापण्यात आला, तर हिंदुत्ववादी सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. हे कुणाच्या अब्बाचे पाकिस्तान नाही, हे आमचे हिंदू राष्ट्र आहे. येथे शरिया कायदा चालणार नाही”, असा हल्लाबोल मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २ जून रोजी केला.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित ‘जनता दरबार’ आटोपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. बकरीदनिमित्त कुर्बानी हा मुस्लिमांचा अधिकार असल्याचे विधान सपा आमदार अबू आझमी यांनी केले होते. त्याबाबत प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले, "कुर्बानी तुमचा अधिकार असेल, मग फटाके फोडणे, होळी खेळणे आमचा अधिकार नाही का? आम्ही जर जबरदस्ती करू लागलो, तर मग? हिंदू सणांवेळी नेहमीच अडथळे का आणले जातात? होळीला सांगितले जाते की ‘ड्राय’ होळी साजरी करा, दिवाळीला म्हणतात फटाके फोडू नका – पण बकरीदच्या वेळी कोणी का म्हणत नाही की पर्यावरणपूरक बकरीद साजरी करा? कोणी का म्हणत नाही की 'वर्च्युअल बकरा' कापा?", असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, "हिंदूंना सतत प्राणीमित्र लोकांचा सल्ला ऐकावा लागतो. मग बकरी ईदच्या वेळी हे प्राणीमित्र कुठे जातात? हजारो बकरे कापले जातात, त्यावर कोणतीच चिंता नाही का? नियम जर हिंदूंवर लागू होत असतील, तर मुस्लिमांवर तेच नियम का लागू होत नाहीत? आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार वागत आहोत. शरिया कायदा आमच्यावर लागू नाही. आम्हाला नियमानुसार रात्री १० नंतर फटाके फोडत नाही, ड्राय होळी साजरी करतो. मग मुस्लिम समाज त्याच नियमांचे पालन का करत नाही?", असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.