संजय राऊतांएवढी दलाली आजपर्यंत कुणीही केली नाही! उद्धवजींनी आवरलं नाही तर...; मंत्री गिरीश महाजनांचा घणाघात

    03-Jun-2025
Total Views |
 
Girish Mahajan
 
मुंबई : संजय राऊतांएवढी दलाली आजपर्यंत कुणीही केलेली नाही. उद्धवजींनी आवरले नाही तर त्यांच्याकडे पुढे कुणीच राहणार नाही, असा घणाघात मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवार, ३ जून रोजी केला आहे. संजय राऊतांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "संजय राऊत ज्यापद्धतीने वागतात, त्यांनी ज्याप्रकारे बडबड केली आणि त्यांनी ज्या पद्धतीने उद्धवजींना आणि त्यांच्या पक्षाला शरद पवारांच्या आणि काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवले आणि त्यात जेवढी दलाली केली तेवढी आजपर्यंत कोणीही केली नसेल. त्यांनी केलेल्या या राजकीय दलालीमुळे उद्धवजींची पूर्ण सेना संपली आणि आज त्यांच्याकडे कुणीही राहिलेले नाही. आता जर उद्धवजींनी आवरले नाही तर त्यांच्याकडे पुढे कुणीच राहणार नाही. संपूर्ण शिवसेना जमीनदोस्त होणार आहे."
 
 
मला बोलायला लावू नका!
 
"मी पक्षाचा पाईक आहे. मी ३५ वर्षे निवडून येतोय. मी कोण आहे, काय आहे हे सर्वांना माहिती आहे. पक्षासाठी मी काहीही करेल. पण मी त्या पक्षाच्या वाढीसाठी करेल. तुमच्यासारखे पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही. दलालीबद्दल बोलाल तर गोरेगावच्या पत्राचाळीत आपण काय केले, किती दिवस तुरुंगात राहिलात हे मला बोलायला लावू नका. बाळासाहेबांच्या हिंदूत्वाला आणि त्यांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आणि शिवसेना आणि उद्धवजींना खुशाल काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवले. तुम्ही सगळी शिवसेना संपवली आणि तुम्ही काय गप्पा करताय? त्यामुळे अजूनही तुमची बडबड बंद झाली नाही तर देवच आता उद्धवजींचे भले करो," अशी टीकाही त्यांनी केली.
 
उबाठा गटात दुश्मनाची गरजच नाही!
 
ते पुढे म्हणाले की, "केवळ सुधाकर बडगुजरच नाही तर उबाठा गटात अनेक नेते नाराज आहेत. नाशिक जिल्ह्यात तर आता उबाठा गटात राहायला कुणीही तयार नाही. पक्षात संजय राऊतांसारखे नेते असताना तिथे दुश्मनाची त्यांना गरज नाही. उद्धव ठाकरेंचेच लोक त्यांचा पक्ष फोडण्यासाठी पुरेसे आहेत. संजय राऊत तेच काम करत आहेत," असा हल्लाबोलही मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.