मजूरी व डिझेल दरवाढीमुळे शेती व्यवसाय धोक्यात; शेतकरी पर्यायी पिकांकडे वळू लागले

03 Jun 2025 18:26:15
Farming business in danger

शहापुर  : शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल वाढत असतानाच डिझेलसह इतर आवश्यक घटकांच्या दरवाढीमुळे शेती करणे अधिकच कठीण झाले आहे. बैलजोडीच्या किंमती लाखोंमध्ये पोहोचल्यात, तर मजुरी दर ५०० ते ६०० रुपयांपर्यंत वाढल्याने शेतकऱ्यांना शेती करण्याचा खर्च परवडेनासा झाला आहे. यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी व खर्च अधिक होत असल्याने अनेकांना तोटा सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांना आता आपल्याच घरासाठी लागणारे धान्य मिळवणेही कठीण होऊ लागले आहे. परिणामी, पारंपरिक भात शेतीऐवजी पर्यायी पिकांकडे वळण्याचा कल शहापूरमधील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

शहापूर तालुक्यातील अजनुप, टेंभा, वाशाळा, दहीगाव, किन्हवली, अघई, कसारा, डोळखांब आदी गावांमध्ये भातशेतीचे काम सध्या सुरू असून, या भागाला तालुक्याचे भाताचे कोठार मानले जाते. मात्र, बैलजोडी व मजुरीच्या दरवाढीमुळे पारंपरिक शेतीसाठी येणारा खर्च वाढल्याने अनेक शेतकरी ट्रॅक्टरसारख्या यंत्रसामग्रीचा आधार घेत आहेत. पण डिझेल दरवाढीमुळे यंत्राद्वारेही शेती करणे परवडेनासे झाले आहे.

यामुळे शेतकरी आता कांदा, लसूण, मोगरा, आंबा, भेंडी, कलिंगड, शेवगा, मिरची, कारले यासारख्या पिकांची लागवड करत आहेत. ही पिके तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चात व कमी मजुरीत जास्त उत्पन्न देतात. काही शेतकरी मात्र आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या अन्नधान्याच्या गरजेसाठी पारंपरिक शेती टिकवून ठेवत आहेत.

यंदा खरीप हंगामाची तयारी करताना शेतकऱ्यांना मजूरच मिळत नाहीत, त्यामुळे यंत्रांवर अवलंबून राहणे अपरिहार्य झाले आहे. यंत्र वापरण्यासाठी होणारा वाढीव खर्च, खतांचे दर, महागडी कीटकनाशके व पावसाचा अनियमितपणा यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे.

पूर्वी बैलांच्या मदतीने केली जाणारी शेती आता यंत्रांद्वारे केली जात असली तरी, वाढते इंधन दर, वाढती मजुरी व उत्पादन खर्च यामुळे शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांची पर्यायी पिकांकडे वाटचाल सुरू झाली आहे.
प्रशांत गडगे
Powered By Sangraha 9.0