‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच

03 Jun 2025 18:53:10
Discussion on Operation Sindoor

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी संसदेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात नियोजित आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या विरोधी पक्षांच्या मागणीचा केंद्र सरकार विचार करत नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

सरकारी सूत्रांनुसार, संसदेचे पुढील अधिवेशन जवळ येत असल्याने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी योग्य ठरत नाही. त्याचप्रमाणे केंद्र सरकार संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा आयोजित करण्याचा विचार करू शकते, जेथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पावसाळी अधिवेशनात निवेदन देऊ शकतात. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील ‘ऑपरेशन सिंदूर’वर बोलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मंगळवारी नवी दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या पक्षांची बैठक आयोजित करण्याचत आली होती. या बैठकीत १६ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. बैठकीस काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि शिवसेना (उबाठा) यासह अनेक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी इंडिया आघाडीने सर्व नेत्यांची स्वाक्षरी असलेले पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
Powered By Sangraha 9.0