मुंबई : कल्याणकडे जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये बोकड घेऊन प्रवास करणारा प्रवासी आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना कुर्ला स्थानकावरून सुरू झाल्याने, या स्थानकावरील अराजकता, प्रचंड गर्दी, फेरीवाल्यांचा वावर आणि रेल्वे प्रशासनाची हलगर्जी पुन्हा एकदा समोर आली आहे.गर्दीच्या तासात झालेल्या या प्रकारामुळे लोकल डब्यात गोंधळ उडाला. बोकड मोकळा फिरत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. काही प्रवाशांनी हा प्रकार मोबाईलवर टिपून सोशल मीडियावर शेअर केला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या घटनेविषयी कुर्ला येथील रेल्वे पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी बामणे यांच्याशी संवाद साधण्यात आला असता, त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,"सदर व्हिडिओ २ ते ३ दिवसांपूर्वीचा असावा. आम्ही याबाबत चौकशी करत आहोत. आमच्या पद्धतीने सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."त्यांच्या या उदासीन व जबाबदारी झटकणाऱ्या उत्तरामुळे प्रवाशांमध्ये आणि स्थानिकांमध्ये अधिकच नाराजीचा सूर उमटला आहे.
कुर्ला स्थानक – अराजकतेचं केंद्रबिंदू
दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या कुर्ला स्थानकावर:
पायवाटांपासून ते अगदी स्टेशनपर्यंत फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे.
गर्दीच्या वेळेत धक्काबुक्की, चेंगराचेंगरीचं वातावरण
फूटओव्हर ब्रिज, जिने आणि दरवाजे अडवलेले
महिलांना आणि वयोवृद्धांना मोठा त्रास,छेडछाड आणि चोरी
असे प्रकार येथे वारंवार दिसून येतात.
प्रतिक्रिया
“कुर्ला स्टेशन म्हणजे रेल्वे मार्केट झालं आहे.”
“महिलांमध्ये भीती आहे, जनावरं लोकलमध्ये का?”
“रेल्वे पोलिसांचा ‘पद्धतशीर’ गोंधळ आहे.”
मुंबई लोकल ही सामान्य माणसाच्या जीवनाची श्वासवाहिनी आहे. परंतु कुर्ला स्थानकावरील अराजकता, फेरीवाल्यांचा उद्रेक, महिला सुरक्षेचा अभाव आणि प्रशासनाची हलगर्जी यामुळे प्रवाशांचे जीवन आणखी कठीण बनत चालले आहे.प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, तसेच प्रवाश्यांच्या हितासाठी किमान १५० मीटर परिसर हा नियमानुसार फेरीवालामुक्त करावा अशी प्रवाशांची आणि नागरिकांची एकमुखी मागणी आहे.
भरत धाकतोडे
स्थानिक प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना