४८ तासांची लढाई आठ तासांत जिंकली!

03 Jun 2025 21:24:35
A 48-hour battle was won in eight hours!

पुणे: "भारताने ४८ तासांची लढाई आठ तासांत जिंकली आणि याच दरम्यान पाकिस्तानने चर्चेचा प्रस्ताव दिला,” असे सांगताना " ‘ऑपरेशन सिंदूर’मागचा मूळ विचार पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद थांबवणे हा होता,” असे प्रतिपादन भारताचे संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी केले. पुणे विद्यापीठात ‘फ्यूचर वॉर अ‍ॅण्ड वॉरफेअर’ या विषयावर मंगळवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी बोलताना सीडीएस चौहान म्हणाले की, ‘’पहलगाममध्ये जे घडलं ते क्रूर होतं. डोळ्यांदेखत कुटुंबातील सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना धर्माच्या नावाखाली मारण्यात आलं.” भारत सर्वाधिक दहशतवादी कृत्यांचा बळी ठरला असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "आतापर्यंत देशात जवळपास २० हजार लोक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत.”

सैनिकांवर अपयश आणि नुकसानीचा परिणाम होत नसल्याचे सांगत, "युद्धादरम्यान कितीही अडथळे आले, तरी मनोबल उंच राहिले पाहिजे. काय चुकलं हे समजायला हवे. कारण, त्या चुका सुधारून पुढे जाता आलं पाहिजे.”

भारत दहशतीच्या सावलीत राहणार नाही


"भारत दहशतीच्या सावलीत राहणार नाही आणि आण्विक ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. दोन्ही देशांनी वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे यात धोका होता, हे स्पष्ट झालं आहे. संघर्षादरम्यान नेहमीच जोखीम असते. पण, तुम्ही जोखीम घेतली नाही, तर कधीही यशस्वी होऊ शकत नाही, असं म्हटलं जातं. आम्हाला माहित होतं की, आमच्याकडे एक चांगली ड्रोनविरोधी प्रणाली आहे,” असेही सीडीएस चौहान म्हणाले.

पाकिस्तानचा आठ तासांत चर्चेचा प्रस्ताव


सीडीएस अनिल चौहान म्हणाले की, "दि. १० मे रोजी पहाटे १च्या दरम्यान पाकिस्तानचा उद्देश भारताला नमवण्याचा होता. त्याकरिता त्यांनी अनेक हल्ले केले. हे हल्ले करून त्यांनी दोन्ही देशांतील संघर्ष वाढवला. त्याबदल्यात आपल्याकडून फक्त दहशतवाद्यांनाच लक्ष्य करण्यात आले होते. जे ऑपरेशन ४८ तास सुरू राहील, असं म्हटलं जात होतं, ते प्रत्यक्षात आठ तासांत गुंडाळण्यात आलं आणि आम्हाला फोन करत भारताबरोबर चर्चा करायची असल्याचे पाकिस्तानने सांगितले,” असे यांनी सांगून चौहान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली.

Powered By Sangraha 9.0