गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल - येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करु भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची माहिती

29 Jun 2025 18:34:14

नवी मुंबई - स्वयंपुनर्विकासाचा विषय पुढे जावा, योजनेकारिता पैसे उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली ‘दरेकर समिती’ नेमली. हे जबाबदारीचे शिवधनुष्य आहे. जनतेचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून अपार कष्ट करत मी महाराष्ट्राचा दौरा केला, बैठका घेतल्या. ३१३ पानांचा अहवाल तयार असून त्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर पुढील आठवड्यात सरकारला सादर करू, अशी माहिती भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष व दरेकर समितीचे प्रमुख प्रविण दरेकर यांनी दिली.

स्वयंपुनर्विकास कृती समिती, नवी मुंबईतर्फे समाज मंदिर हॉल, डी मार्टच्या मागे, नवी मुंबई महानगर पालिका शाळेजवळ,भू. क्र. १०, सेक्टर ७, घणसोली, नवी मुंबई येथे स्वयंपुनर्विकास विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उपस्थित राहून आ. दरेकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाजसेवक अंकुश कदम, अभ्यासक वक्ते हर्षद मोरे, दि ठाणे जिल्हा सह. बँकेचे अधिकारी शरद काशिवले, दि ठाणे जिल्हा सह. बँकेच्या प्रथम श्रेणी अधिकारी योगिता कोठेकर, आयोजक शिवाजी धनावडे, सतिश निकम, मयूर धुमाळ, प्रविण खेडेकर, कमला पाटील, महादेव कदम, विनायक जाधव यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले की, १५ वर्षांपूर्वी स्वयंपुनर्विकास होऊ शकतो हा विचार मी मांडला आणि आज त्या विचाराच्या छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होताना दिसतेय. हे यश स्वयंपुनर्विकासाला मिळतेय. विकासक पैसे लावतो, वेगवेगळ्या परवानग्या आणतो म्हणून आपण त्याच्याकडे जातो. या दोन गोष्टींची पूर्तता आपण केली, गृहनिर्माण सोसायटीला पैसे उपलब्ध करून दिले व राज्य सरकारने या योजनेला राजाश्रय देऊन परवानग्यांचे जंजाळ दूर करत निश्चित वेळेत परवानग्या दिल्या तर आपल्याला स्वयंपुनर्विकास करणे सोपे आहे. यासाठी मुंबई जिल्हा बँकेने स्वयंपुनर्विकास कर्ज धोरण बनवले आणि त्याला मान्यता दिली.

दरेकर पुढे म्हणाले की, या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यांना या योजनेचे महत्व पटवून दिले. सर्वसामान्य माणसाला दुप्पट, तिप्पट स्वरूपात स्वतःचा विकास करत स्वयंपुनर्विकासातून घर मिळणार आहे. त्यासाठी परवानग्या देण्याची गरज आहे,अशी विनंती केली. याकरिता गोरेगावला गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. या परिषदेत स्वयंपुनर्विकासाच्या २० वेगवेगळ्या मागण्या सरकारकडे केल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी २० पैकी १८ मागण्या केवळ मान्य केल्या नाहीत तर त्याचे शासन निर्णयही केले. सरकारने स्वयंपुनर्विकासात जेवढ्या म्हणून सुविधा देता येतील तेवढ्या दिल्या असल्याचेही दरेकर म्हणाले.

हे स्वप्न नाही तर करून दाखवलेय

दरेकर म्हणाले की, स्वयंपुनर्विकासात ३ वर्षात इमारत उभी करायची असते. तसा निर्णय मुख्यमंत्री यांनी दिला आहे. मुंबई जिल्हा बँकेकडे स्वयंपुनर्विकासासाठी १६०० प्रस्ताव आलेत. ४६ प्रकल्पना कर्ज मंजूर केले असून १५ इमारती मुंबईत उभ्या राहिल्या आहेत. हे स्वप्न नाही तर करून दाखवलेय. या योजनेत जसजशा अडचणी येत गेल्या तसतशा त्या सोडवत गेलो.

आम्ही अंगण वाकडे नाही, तर अंगण वाढविणारे आहोत

दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील आहेत. त्यांनी चारकोप येथील चावी वाटपाच्या जाहीर सभेत निर्णय केला की, सोसायट्यांना ३ वर्ष कुठल्याही प्रकारच्या प्रीमियमवर व्याज घेतले जाणार नाही. आमचा उद्देश सर्वसामान्य, मध्यम वर्गीय माणसाला त्याच्या आयुष्यातील अंतिम स्वप्न घर मिळावे हा आहे. आम्ही अंगण वाकडे नाही तर अंगण वाढविणारे आहोत. जेवढ्या लोकांना पैसे लागतील तेवढ्या लोकांना पैसे उपलब्ध करून देण्याची तरतूद करतोय. ठाणे जिल्हा बँकेनेही ही योजना आणलीय. त्यांनी व्याज दरही कमी केलाय. आज ठाण्यात स्वयंपुनर्विकासाचे अभियान मोठ्या प्रमाणावर गती घेत असल्याचेही दरेकर म्हणाले.

सर्वार्थाने स्वयंपुनर्विकास योजना लाभदायी

दरेकर म्हणाले की, मध्यम वर्गीय मराठी माणूस वाशी, ठाणा,विरार, कसाऱ्यापर्यंत चाललाय. आम्ही मराठी माणसाच्या हिताचे बोलतो परंतु मराठी माणूस बाहेर का चाललाय याचा विचार करणे गरजेचे आहे. गिरगांव, शिवडी येथे असणारी २००-३०० स्क्वे.फुटाच्या जागेऐवजी ७००-८००स्क्वे. फुटाचे घर स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून मिळाले तर मुंबई, ठाण्यातील मराठी माणूस या शहरातच राहील. त्यामुळे हा आपल्या स्वाभिमानाचा विषय होणार आहे. सर्वार्थाने स्वयंपुनर्विकास योजना लाभदायी आहे.

Powered By Sangraha 9.0