नवी दिल्ली : राकेश शर्मा हे १९८४ साली अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले. शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहे. भारताने त्यांच्या अंतराळ प्रवासासाठी तब्बल ५४८ कोटी रुपये खर्च केले आहेत. शुभांशू शुक्ला यांनी २६ जून रोजी ऍक्सियम फोर मिशनच्या अंतर्गत अमेरिकेतून अंतराळात झेपावले. २८ तासांच्या प्रवासानंतर ते ISS वर पोहोचले, जिथे ते १४ दिवस राहणार आहेत.
भारत सध्या गगनयान मिशनवर काम करत आहे. शुभांशू शुक्ला हे गगनयानसाठी निवडलेल्या अंतराळवीरांपैकी एक आहेत. इस्त्रोचे माजी वैज्ञानिक तपन मिश्रा याबद्दल माध्यमांना माहिती देताना म्हणाले की "सिम्युलेटरच्या माध्यमातून प्रशिक्षण देता येते, परंतु प्रत्यक्षात घेतला जाणारा हा अनुभव अनेक अंतराळ मोहिमांसाठी अमूल्य ठरणार आहे.
' हे ' ७ विज्ञान प्रयोग ठरणार महत्वाचे!
१. मायक्रोग्रॅविटीमध्ये (शून्य गुरुत्वाकर्षण) संगणक स्क्रीनचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? याविषयी अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला कळू शकणार आहे.
२. अंतराळात कुठल्या प्रकारचे अन्न खाल्याने ऊर्जा मिळते? या विषयी अधिकची माहिती कळू शकणार आहे.
३. तांदूळ, तिळ, वांगं, चवळी आणि टोमॅटोची बियं अंतराळात नेण्यात आले आहे. मायक्रोग्रॅविटीमध्ये बियांचे अंकुरण, वाढ आणि जनुकांमध्ये होणारे बदल यांचा अभ्यास करतील.
४. मायक्रोग्रॅविटीमुळे शरीराच्या स्नायूंमध्ये काय बदल होतात, आणि त्यावर काय उपाय होऊ शकतो?
५. अंतराळात सूक्ष्मजीवांची सहनशक्ती किती आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रयोग.
६. सायनोबॅक्टेरिया अंतराळात कशा प्रकारचा प्रतिसाद देतात
७. अंतराळातील जीवनशैली त्यामुळे शरीरात होणारे बदल, पाण्याचे व्यवस्थापन, खाण्यापिण्याची शिस्त आणि कचऱ्याचे नियोजन यांचाही अभ्यास केला जाणार आहे.
भारताने केलेली गुंतवणूक ही केवळ एका मोहीमेसाठी केली गेलेली गुंतवणूक नाही, तर अवकाश तंत्रज्ञानाच्यादृष्टीने स्वावलंबी होण्याच्या दिशेने उचलले हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल आहे.