वसईत छत्रपती शाहू महाराज जन्म महोत्सव सोहळा संपन्न

29 Jun 2025 21:01:34

विरार : सामाजिक न्याय हा मूळ हेतू साध्य करण्याचा उद्देश्य समोर ठेवून राष्ट्रीय बहुजन विकास संघटना, प्रजा सुराज्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि मदर सेवा फोंडेशन संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराजांचा जन्म महोत्सव सोहळा गुरुवार दि. २६ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा वसई क्रमांक- १ व उर्दु शाळा वसई या दोन्ही शाळेचे विद्यार्थी, मुख्यध्यापिका व शिक्षकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मदर सेवा फोंडेशनचे शाहिद शेख यांनी छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाळा अर्पण आली. ह्या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय बहुजन विकास संघटना तथा प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद उर्फ अण्णासाहेब तिगोटे म्हणाले की, छ. शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वच समाज घटकांसाठी महत्वपूर्ण काम केले आहे.

त्यात विशेष करून शैक्षणिक आणि आरोग्य विभागात भरीव कामगिरी केली. वंचित, आर्थिक दुर्बळ घटकांतील नागरिकांचे जीवन सुरक्षित, समृद्ध आणि आनंदी करण्यासाठी आरक्षण लागू करण्याचा मोठा धाडसी निर्णय छ. शाहू महाराजांनी घेतला, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संघटना व पक्षातर्फे सामाजिक न्याय पुन्हा स्थापन करण्यासाठी विद्यार्थी, युवक, युवती, महिला या सर्वांना छ. शाहू महाराजांचे जात, पात, धर्मापलीकडे जाऊन सर्वसामन्य माणसासाठी केलेले सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृतीचे कार्य हाती घेऊन वसईत छ. शाहु महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी प्रजा सुराज्य पक्षाचे जन. सेक्रेटरी शिवदास मोरे, उपाध्यक्ष तथा पोलीस अधिकारी राहुल ऊडानशिव, दिव्यांग विभागाचे सचिव नीलेश देशपांडे, रमा जाधव, शिल्पा भावसार, मदर सेवा फोंडेशनचे ॲड. खालिद शेख, संघटनचे कार्याध्यक्ष मा. जितेंद्र शिरसाट, ॲड. आसिफ शेख, मीना तडवी सचिव, संतोष मद्रास, जेरी मचाडो, ॲड. किरण म्हात्रे इ. मान्यवर तसेच सुरेश पुजारी, गणी पिंजारी, सुरेश ठोंबरे, निलोफर पिंजारी, गीता पानपाटील, संघटना व पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.



Powered By Sangraha 9.0