कोण आहेत पराग जैन? 'सुपर स्पाय' म्हणून ओळख, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका!

28 Jun 2025 18:10:25

नवी दिल्ली : (Parag Jain)
केंद्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी पराग जैन यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) म्हणजेच 'रॉ'चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पराग जैन हे १९८९ च्या बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. जैन १ जुलै रोजी दोन वर्षांच्या निश्चित कार्यकाळासाठी पदभार स्वीकारतील. ते सध्याचे प्रमुख रवी सिन्हा यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. त्यानंतर पराग जैन पदभार सांभाळतील. 

दहशतवादविरोधी मोहिमेत कार्यरत 

पराग जैन यांनी १५ वर्षांहून अधिक काळ 'रॉ'मध्ये काम केले आहे आणि सध्या एव्हिएशन रिसर्च सेंटर (ARC) चे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. प्रत्यक्षात ARC हा RAW चा एक महत्त्वाचा भाग आहे जो तांत्रिक आणि हवाई गुप्तचर माहिती गोळा करण्याचे काम करतो. पराग जैन यांनी पंजाबमधील दहशतवादाच्या काळातही महत्त्वाची भूमिका बजावली होती, जिथे त्यांनी भटिंडा, मानसा, होशियारपूर, चंदीगड येथे एसएसपी आणि लुधियाना येथे डीआयजी म्हणून काम केले आहे. याशिवाय पराग यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना जम्मू आणि काश्मीरमध्येही तैनात करण्यात आले आहे, जिथे त्यांनी संघर्षग्रस्त केंद्रशासित प्रदेशात केंद्राच्या दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका

भारतीय सैन्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पराग जैन यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. खरं तर, एव्हिएशन रिसर्च सेंटरने जैन यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सशस्त्र दलांबद्दल गोळा केलेल्या गुप्त माहितीच्या आधारे दहशतवादी पायाभूत सुविधांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. भारत सध्या सीमापार दहशतवादाविरोधात लढा देत आहे. अशा आव्हानात्मक काळात जैन यांची 'रॉ'चे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. तज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे की, जैन यांचा अनुभव आणि धोरणात्मक दृष्टिकोन रॉ'ला अधिक बळकट करण्यास मदत करेल.

'रॉ' म्हणजे काय?

'रॉ' ही भारताची गुप्तचर संस्था आहे, जी परदेशात आणि देशात घडणाऱ्या देशविरोधी कारवायांची माहिती गोळा करते आणि ती माहिती सुरक्षा यंत्रणांना देते जेणेकरून ते हाणून पाडता येतील. 'रॉ'ची स्थापना २१ सप्टेंबर १९६८ रोजी स्थापना झाली. 'रॉ'चे पहिले प्रमुख आर. एन. काओ होते. पंतप्रधान रॉ'चे प्रभारी असतात.'रॉ' प्रमुख आपला दैनंदिन अहवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना देतात. अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.




Powered By Sangraha 9.0