केरळमध्ये अडकलेल्या F-35B या ब्रिटिश लढाऊ विमानाची दुरुस्ती भारतातच होणार!

    28-Jun-2025   
Total Views |

UK


तिरुवनंतपुरम : (UK's F-35B Fighter Jet) इराण-इस्त्रायल युद्ध काळात १४ जूनच्या रात्री ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एफ-३५ बी लढाऊ विमानाने केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले होते. आपत्कालीन लँडिंगनंतर जवळपास दोन आठवड्यांपासून हे लढाऊ विमान विमानतळावरच अडकून पडले आहे. ब्रिटिश रॉयल नेव्हीचे हे विमान अशा प्रकारे एखाद्या ठिकाणी अडकून पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. केरळच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आता या विमानाची दुरुस्ती भारतातच होणार आहे आणि त्यासाठी ब्रिटनहून ४० तज्ञ आणि अभियंत्याचे एक पथक दोन टो व्हेईकल्ससह केरळमध्ये लवकरच दाखल होणार आहे.

भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई क्षेत्रात आलेल्या या विमानात इंधनाची कमतरता निर्माण झाली होती. केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे १०० नॉटिकल मैल अंतरावर विमान उड्डाण करत असताना त्याला खराब हवामानाचा सामना करावा लागला. त्यामुळे पायलटने दक्षिणेकडील राज्यातील नागरी विमानतळावर विमान उतरवण्याची परवानगी मागितली. या विमानाने आणीबाणीची घोषणा केली आणि भारतीय हवाई दलाच्या इंडिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमने त्यावर त्वरित अॅक्शन घेत ते लँड करण्यासाठी परवानगी दिली, असे भारतीय हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे.

जवळपास पंधरवडा उलटून गेला तरी हे विमान विमानतळावरच उभे आहे. तांत्रिक बिघाडामुळे ते पुन्हा उड्डाण करू शकलेले नाही. मान्सूनच्या परिस्थितीमुळे देशांतर्गत टर्मिनलजवळील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या या विमानाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडून सांभाळली जात आहे. केरळच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एफ-३५ बी जेटची दुरुस्ती करण्यासाठी ब्रिटनहून ४० अभियंते आणि लष्करी तज्ञांची विशेष टीम लवकरच भारतात दाखल होणार आहे. या टीमसोबत दोन विशेष टो व्हेईकल्स (वाहने) देखील आणली जात आहेत, जे विमान दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहेत.

जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक असलेले हे जेट, सर्वांत प्रगत लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या या लढाऊ विमानाची शॉर्ट टेकऑफ आणि व्हर्टिकल लैंडिंग क्षमता आहे. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर केलेला आहे. हे स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त विमान शत्रूच्या रडारवर सहजपणे न सापडण्यास सक्षम आहे. त्यामध्ये सेन्सर्स, मिशन सिस्टीम व स्टेल्थ वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याचे नियंत्रण आणि दुरुस्ती फक्त उच्च प्रशिक्षित अभियंत्यांकडूनच शक्य असते. त्यामुळेच, ब्रिटनने आपल्या खास अभियांत्रिकी पथकाला भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विमानाच्या सुरक्षित लँडिंगपासून ते इंधन भरणे, लॉजिस्टिक सपोर्ट आणि तांत्रिक सहाय्य या सर्व गोष्टींमध्ये भारताने ब्रिटनला संपूर्ण सहकार्य केले आहे. आता नव्याने करण्यात येणारे दुरुस्तीचे प्रयत्न जर अयशस्वी झाले तर जेटला एअरलिफ्ट करून ब्रिटनला नेणे हा एकमेव पर्याय उरणार आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\